IndiGo Cancels 650 Flights On Day 6 Of Crisis : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, रविवारी 650 उड्डाणे रद्द झाली. DGCA ने CEO ला नोटीस बजावली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने परतावा आणि भाड्याची मर्यादा निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. 

IndiGo Cancels 650 Flights On Day 6 Of Crisis : इंडिगोच्या उड्डाणे रद्द होण्याचा फटका सलग सहाव्या दिवशीही बसला आहे. ऑपरेशनल अडचणींमुळे रविवार, 7 डिसेंबर रोजी एकूण 650 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. इंडिगोने जारी केलेल्या निवेदनानुसार, रविवारी एकूण 2300 दैनंदिन उड्डाणांपैकी फक्त 1650 उड्डाणेच ऑपरेशनल होती.

कोणत्या शहरातून किती उड्डाणे रद्द?

रविवारी हैदराबाद विमानतळावर 115, मुंबई विमानतळावर 112, दिल्लीत 109, चेन्नईत 38 आणि अमृतसरमध्ये 11 उड्डाणे रद्द करण्यात आली. मंगळवारपासून इंडिगोने 2,000 हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत आणि इतर अनेक उड्डाणांना विलंब केला आहे, ज्यामुळे मोठ्या संख्येने प्रवासी विमानतळावर अडकून पडले आहेत.

इंडिगोच्या सीईओला कारणे दाखवा नोटीस जारी

डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांना नियोजन, देखरेख आणि संसाधन व्यवस्थापनातील मोठ्या त्रुटींसाठी जबाबदार धरत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. DGCA ने त्यांना 24 तासांची मुदत दिली असून, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई का सुरू करू नये, याचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द होणे आणि विलंब होणे हे देशातील सर्वात मोठे विमान वाहतूक संकट बनले आहे.

प्रवाशांचा परतावा क्लिअर करण्याचे इंडिगोला आदेश

दरम्यान, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने शनिवारी एअरलाइनला 7 डिसेंबर (रविवार) रात्री 8 वाजेपर्यंत उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांचे सर्व प्रलंबित परतावे (रिफंड) क्लिअर करण्याचे निर्देश दिले. प्रवाशांपासून वेगळे झालेले कोणतेही बॅगेज पुढील दोन दिवसांत परत केले जाईल, याची खात्री करण्यासही मंत्रालयाने इंडिगोला सांगितले आहे. यासोबतच, देशातील विविध ठिकाणांदरम्यानच्या विमान भाड्यात झालेल्या मोठ्या वाढीनंतर देशांतर्गत उड्डाणांवर भाड्याची मर्यादाही निश्चित केली आहे.

इंडिगोचे संकट कधी संपणार?

इंडिगोने आपल्या ताज्या निवेदनात म्हटले आहे की, ते आपल्या संपूर्ण नेटवर्कमध्ये सातत्याने सुधारणा करत आहे. 10 डिसेंबरपर्यंत कामकाज सामान्य होण्याची अपेक्षा आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी कंपनीने एक संकट व्यवस्थापन गट स्थापन केला आहे, जो प्रवाशांना होणारा त्रास दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.