मान्सून 'या' भागात दाखल, हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

| Published : May 19 2024, 01:05 PM IST / Updated: May 19 2024, 01:31 PM IST

bengaluru rain .jpg

सार

मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी समोर आली आहे. नैऋत्य मान्सून मालदीव, कोमोरिनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागासह निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे.

मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी समोर आली आहे. नैऋत्य मान्सून मालदीव, कोमोरिनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागासह निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं (IMD) याबाबतची माहिती जाहीर केली आहे. गेल्या 24 तासात निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

31 मे ला मान्सून केरळात दाखल होणार?

मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात दिलेल्या वेळेत दाखल झाला आहे. 31 मे ला मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. साधारणपणे मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होतो. पण यावर्षी मान्सून एक दिवस आधीच म्हणजे 31 मे ला दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. असं असलं तरी तीन चार दिवस मागे पुढेही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 30 मे ते 4 जून दरम्यान मान्सून भारतात येण्याची शक्यता आहे. केरळमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मान्सून हा अंदमान निकोबार बेटांवर येतो. दरवर्षीचा विचार करता अंदमान बेटावर तो 21 मे ला दाखल होत असतो. पण यावेळी तो दोन दिवस आधीच येणार आहे. गेल्यावर्षीही मान्सून अंदमानमध्ये 19 मे ला आला होता. पण केरळमध्ये नऊ दिवस उशिराने आला.