भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी पारंपरिक राजस्थानी ‘बंधेज’ पगडी परिधान केली होती.

मुंबई : देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर आयोजित मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोशाखातील राजस्थानी ‘बंधेज’ पगडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गडद लाल रंगाच्या या पगडीवर पांढऱ्या रंगाचे छोटे ठिपके आहेत. या पारंपरिक भारतीय हस्तकलेचे दर्शन घडले. पंतप्रधान मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या पोशाखातून यंदाही ‘व्होकल फॉर लोकल’चा संदेश दिला गेला.

‘बंधेज’ पगडीची खासियत?

‘बंधेज’ ही भारतातील पारंपरिक टाय-अँड-डाय हस्तकला आहे. यामध्ये कापडाला विशिष्ट पद्धतीने धाग्याने बांधून त्यावर रंगकाम केले जाते. राजस्थान आणि गुजरातमध्ये या कलेला विशेष महत्त्व आहे. सण, उत्सव, विवाह सोहळे तसेच विविध शुभ प्रसंगी बंधेजचे कपडे आणि पगड्या वापरल्या जातात. त्यामुळे बंधेज केवळ एक पोशाख नाही. तर भारतीय सांस्कृतिक परंपरा आणि स्थानिक कारागिरांच्या कौशल्याचे प्रतीक मानले जाते.

लाल रंगाची बंधेज पगडी ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी गडद लाल रंगाची बंधेज पगडी परिधान केली होती. त्यावर पांढऱ्या रंगाचे छोटे-छोटे ठिपके होते, जे बंधेज कलेची प्रमुख ओळख मानले जातात. भारतीय परंपरेत लाल रंगाला शुभत्व, उत्साह, ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात ही पगडी विशेष उठून दिसली.

स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देण्याचा संदेश

पंतप्रधान मोदी यांच्या पोशाखातून स्थानिक हस्तकला आणि पारंपरिक कारागिरांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला. ‘व्होकल फॉर लोकल’च्या माध्यमातून स्वदेशी प्रोडक्ट्स, हस्तकला आणि स्थानिक कौशल्यांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे. बंधेज पगडीची निवड ही त्याच भूमिकेशी जोडली जात आहे.

पांढरा कुर्ता-पायजमा आणि बंधेज पगडीचा खास लूक

पंतप्रधान मोदी यांनी ध्वजारोहणावेळी पांढरा कुर्ता-पायजमा आणि त्यावर जॅकेट परिधान केले होते. त्यासोबतची बहुरंगी बंधेज पगडी त्यांच्या पोशाखाला वेगळा आणि पारंपरिक लूक देत होती. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात पंतप्रधानांच्या पगडीकडे दरवर्षी विशेष लक्ष असते.

वर्ष २०१४ पासून मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी विविध रंग आणि शैलीतील पारंपरिक साफा किंवा पगडी परिधान करण्याची परंपरा कायम ठेवली आहे.यंदाही या परंपरेला पुढे नेत पंतप्रधान मोंदीनी राजस्थानी बंधेज पगडीची निवड केली. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यातील त्यांच्या पोशाखाची चर्चा सोशल मीडिया आणि सार्वजनिक वर्तुळातही पाहायला मिळत आहे.