Hyderabad Indigo Flight : हैदराबादमध्ये एक मोठी दुर्घटना टळली आहे. १६२ प्रवाशांसह लँड होणाऱ्या विमानाला अनपेक्षित धोका निर्माण झाला होता. मात्र, पायलटच्या चाणाक्षपणामुळे सर्व प्रवासी सुखरूप लँड झाले. सविस्तर जाणून घेऊया.. 

Hyderabad Indigo Flight : शमशाबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोच्या विमानाची मोठी दुर्घटना टळली. गुरुवारी सकाळी लँडिंगच्या वेळी विमानाला एक पक्षी धडकला. यावेळी विमानात १६२ प्रवासी होते.

मात्र, धोका वेळीच ओळखून पायलटने तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चाणाक्षपणे विमान हाताळले. त्यांनी विमान सुरक्षितपणे लँड करून प्रवाशांना कोणतीही इजा न होता वाचवले.

ही घटना पाहून विमानतळ अधिकारी आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या घटनेने आपत्कालीन परिस्थितीत पायलटचे कौशल्य किती महत्त्वाचे असते हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

उंदरामुळे विमानाला उशीर

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी इंडिगोच्या विमानात एका उंदराने धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली होती. ही घटना कानपूरमध्ये घडली. १७२ प्रवाशांसह दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला एका उंदरामुळे तीन तास उशीर झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. विमान कर्मचारी टेक-ऑफची तयारी करत असताना, त्यांना केबिनमध्ये एक उंदीर धावताना दिसला. त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आणि प्रवाशांना विमानातून लॉंजमध्ये हलवण्यात आले. कर्मचाऱ्यांनी सुमारे तासभर प्रयत्न करून उंदराला विमानातून बाहेर काढले.