ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या फेस्टिव्हल सेलमध्ये पहिल्यांदाच बाईक आणि स्कूटरवर भन्नाट डिस्काउंट मिळत आहे. हिरो, टीव्हीएस आणि बजाजसारख्या ब्रँड्सवर बँक ऑफर्सही आहेत. पण खरेदी करण्यापूर्वी एक्स-शोरूम आणि ऑन-रोड किमतींची तुलना नक्की करा.
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर (Amazon and Flipkart) सध्या बंपर ऑफर्सचा पाऊस पडतोय. सणासुदीच्या मुहूर्तावर या दोन्ही प्लॅटफॉर्म्सनी आपापले मेगा सेल सुरू केले आहेत. यंदाच्या सेलची सर्वात मोठी खासियत म्हणजे, आता तुम्ही चक्क बाईक आणि स्कूटरही ऑनलाइन खरेदी करू शकता.
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टने फेस्टिव्हल सेलला दणक्यात सुरुवात केली आहे. यंदा पहिल्यांदाच टू-व्हीलर्सचाही ऑनलाइन शॉपिंग डील्समध्ये समावेश करण्यात आलाय. अर्थात, सगळ्याच गाड्यांवर डिस्काउंट नाहीये. पण काही निवडक मॉडेल्सवर मात्र तगड्या ऑफर्स आहेत. ॲमेझॉनवर 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' तर फ्लिपकार्टवर 'बिग बिलियन डेज' सेल सुरू आहे.
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज
- हिरो एक्स्ट्रीम 125 R - किंमत ₹84,700 पासून सुरू
- हिरो स्प्लेंडर+ - किंमत ₹71,048 पासून सुरू
या किमती बघून लगेच हुरळून जाऊ नका. कारण मॉडेल, व्हर्जन, तुमचं शहर, टॅक्स आणि बुकिंगच्या अटींनुसार या किमती बदलू शकतात. फ्लिपकार्टने हिरो कंपनीच्या गाड्यांवर जास्त फोकस केलाय. त्यांच्या दाव्यानुसार, हिरो एक्स्ट्रीम 125 R ची किंमत ₹84,700 पासून, तर हिरो स्प्लेंडर+ ची किंमत ₹71,048 पासून सुरू होतेय. याशिवाय, ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या कार्डवर 10 टक्के एक्स्ट्रा डिस्काउंटही मिळतोय. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये हिरो, टीव्हीएस, सुझुकी, एथर आणि बजाजसारख्या ब्रँड्सच्या गाड्या उपलब्ध आहेत.
ॲमेझॉनवर काय आहेत ऑफर्स?
ॲमेझॉनच्या 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल'मध्ये हिरो डेस्टिनी 125 स्कूटर ₹79,119 च्या सुरुवातीच्या किमतीत मिळतेय. ही स्कूटर 55 किलोमीटरचा मायलेज देते आणि तिचा टॉप स्पीड 85 किमी प्रति तास इतका आहे. यात 9.1 PS इंजिन आणि CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिलंय. यासोबतच ॲमेझॉनवर जावा-येझदी आणि रॉयल एनफिल्डच्या बाईक्सही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासा
- ऑफरमध्ये गाडी घेतल्यास तुमचे नक्कीच पैसे वाचू शकतात.
- पण फक्त डिस्काउंटचा आकडा बघून गाडी बुक करू नका.
- गाडीची एक्स-शोरूम किंमत आणि सेलमध्ये मिळणारी किंमत यांची तुलना करा.
- बँक डिस्काउंट, ईएमआय (EMI) ऑफर्स आणि इतर छुपे चार्जेस तपासून बघा.
- आरटीओ (RTO), इन्शुरन्स आणि रजिस्ट्रेशनचा खर्च वेगळा असतो, हे लक्षात ठेवा.
- ₹71,048 किंवा ₹79,119 ला मिळणाऱ्या या गाड्यांची खरी 'ऑन-रोड' किंमत किती पडतेय, याची आधीच चौकशी करा.
