गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सिंहांच्या मिलनावेळी मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणावर सिंहाने हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला असून, गेल्या महिन्याभरातील ही चौथी घटना आहे.

अहमदाबाद: गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील अंटालिया गावाजवळ एका २१ वर्षीय तरुणाचा सिंहाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोहिल मेमन असं या तरुणाचं नाव आहे. गेल्या महिन्याभरात अमरेली परिसरात सिंहाच्या हल्ल्यात माणसाचा मृत्यू होण्याची ही चौथी घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहिल आणि त्याचे दोन मित्र सिंहांना पाहण्यासाठी आणि त्यांचे मोबाईलमध्ये फोटो-व्हिडिओ काढण्यासाठी बेकायदेशीरपणे राखीव जंगल परिसरात गेले होते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

ज्यावेळी हे तरुण जंगलात पोहोचले, तेव्हा तिथे सिंहांचं मिलन सुरू होतं. सिंहांच्या अगदी जवळ जाऊन व्हिडिओ काढण्याच्या प्रयत्नात असताना एका नर सिंहाने त्यांच्यावर हल्ला केला. सोहिलच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे, चिडलेल्या नर सिंहाने थेट सोहिलवर हल्ला केला आणि त्याला जंगलात आत ओढत नेऊन ठार मारलं. हल्ला होताच त्याचे मित्र घाबरून पळून गेले.

यानंतर बराच वेळ तो सिंह मृतदेहाजवळच बसून होता. त्यामुळे वन विभाग आणि पोलिसांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. अखेर सिंहाला दूर करून मृतदेह जंगलाबाहेर आणण्यात आला. हल्ला करणाऱ्या सिंहाला नंतर वन विभागाने बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन पकडलं आहे. बेकायदेशीरपणे जंगलात शिरल्याबद्दल दोघांना अटक करण्यात आली आहे. गीर अभयारण्याच्या बाहेर काही स्थानिक एजंट पर्यटकांसाठी अशा बेकायदेशीर 'लायन सफारी' चालवतात का, याचा तपास आता वन विभागाने सुरू केला आहे.