गुजरातमध्ये आलेल्या पुरात बंधन बँकेचा एक कर्मचारी गळ्यापर्यंत पाण्यात अडकला. 'ऑफिसची चावी माझ्याजवळ आहे, पण कामावर पोहोचू शकत नाही,' असं सांगणारा त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.
अहमदाबाद : गुजरातमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असून, त्यामुळे अनेक शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे लोकांचं रोजचं जगणं मुश्किल झालं आहे. अशातच, वलसादमधील एका बँक कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो घराबाहेर रस्त्यावर गळ्यापर्यंत पाण्यात उभा आहे आणि ऑफिसला पोहोचू शकत नसल्याची व्यथा मांडत आहे. हा तरुण बंधन बँकेत कामाला आहे.
'बँकेची चावी खिशात आहे, पण...'
शिवम सिंह असं या तरुणाचं नाव असून तो बंधन बँकेत चीफ रिलेशनशिप ऑफिसर आहे. त्यानेच हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. गुजरातच्या वलसादमधील मोगरावाडी भागातील अक्षरधाम रेसिडेन्सी या सोसायटीमधून शिवमने हा व्हिडिओ बनवला. घरातून बाहेर पडताच पाणी धोकादायक पातळीपर्यंत वाढलं होतं. त्यामुळे प्रवास करणं सुरक्षित नसल्याने ऑफिसला पोहोचता आलं नाही, असं शिवम व्हिडिओमध्ये सांगतोय. पाणी साचल्यामुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि रोजचं आयुष्य खूपच कठीण झालं होतं, असंही त्याने सांगितलं. व्हिडिओमध्ये रस्त्यावर गळ्यापर्यंत पाणी साचलेलं स्पष्ट दिसतंय.
शिवमच्या म्हणण्यानुसार, २३ जुलै रोजी रात्रभर आणि दिवसभर पाऊस पडत होता आणि त्याने हा व्हिडिओ सकाळी ७ वाजता शूट केला. ऑफिसची चावी त्याच्याकडेच होती, पण तिथपर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग नव्हता, असंही तो पुढे म्हणाला.
'कर्मचाऱ्यांना सुट्टी द्या'
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीत कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करायला हवी, असं मत अनेकांनी मांडलं. धोकादायक परिस्थितीत ऑफिसला पोहोचण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला जास्त महत्त्व द्यायला हवं, असंही अनेकांनी म्हटलं आहे.
पाऊस आणि पुराचा फटका बसलेल्या भागांतील कर्मचाऱ्यांसाठी कंपन्यांनी कामाच्या सोयीस्कर वेळा किंवा 'वर्क फ्रॉम होम'सारखे पर्याय उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही काहींनी केली आहे. दरम्यान, गुजरातच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक जवळजवळ पूर्णपणे ठप्प झाली आहे.
सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावं, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. पावसाचा जोर पाहता अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षा नियमांचं पालन करावं, असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलं आहे.


