गोव्यातील मांद्रे आणि गालगीबाग या दोन समुद्रकिनाऱ्यांना २०२६-२७ साठी 'ब्ल्यू फ्लॅग' प्रमाणपत्र मिळालं आहे. हे किनारे नेमके का खास आहेत, त्यांचं पर्यावरण महत्त्व काय आणि तिथे भेट देण्यापूर्वी पर्यटकांनी कोणत्या गोष्टी जाणून घ्याव्यात, ते वाचा.
मुंबई : तुम्ही गोवा ट्रिपचा प्लॅन करताय का? नेहमीच्या त्याच-त्याच गर्दीच्या बीचला कंटाळला असाल आणि गोव्यातले काही शांत आणि लपलेले किनारे एक्सप्लोर करायचे असतील, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. गोव्यातील लोकप्रिय किनाऱ्यांव्यतिरिक्त इथे अनेक कमी परिचित भाग आहेत. यातल्याच दोन किनाऱ्यांना 'ब्ल्यू फ्लॅग' पुरस्कार मिळाला असून त्यांनी जागतिक यादीत स्थान मिळवलं आहे.
उत्तर गोव्यातील मांद्रे आणि दक्षिण गोव्यातील गालगीबाग या किनाऱ्यांना २०२६-२७ साठी हा पुरस्कार मिळाला आहे.
इंटरनॅशनल ब्ल्यू फ्लॅग ज्युरी आणि फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन (FEE) ने शिक्कामोर्तब केल्यानंतर, २० नोव्हेंबरला गोवा सरकारने या पुरस्काराची घोषणा केली. यामुळे जागतिक स्तरावर ओळख मिळालेल्या भारतातील किनाऱ्यांच्या यादीत आता गोव्याचाही समावेश झाला आहे.
मांद्रे आणि गालगीबाग का आहेत खास?
उत्तर गोव्यातील मांद्रे हे सुंदर निसर्ग आणि हिरवळीसाठी ओळखले जाते. इथला शांत आणि स्वच्छ किनारा पर्यटकांना खूप भावतो.

दक्षिण गोव्यातील गालगीबाग या किनाऱ्याला नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. इथे ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी घालण्याची जागा असल्यामुळे हा किनारा अधिक खास ठरतो.

हा पुरस्कार या भागाच्या संरक्षणाची गरज अधोरेखित करतो आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देतो.
काय आहे ब्ल्यू फ्लॅग पुरस्कार?
पाण्याची गुणवत्ता, स्वच्छता, पर्यावरणविषयक ज्ञान आणि सुरक्षितता, तसेच विश्रांतीच्या सुविधा यांसारख्या जागतिक नियमांची पूर्तता करणाऱ्या किनाऱ्यांना 'ब्ल्यू फ्लॅग' दर्जा दिला जातो. हा पुरस्कार टिकवून ठेवण्यासाठी या किनाऱ्यांना ४ मुख्य विषयांखालील ३३ अटींची पूर्तता करावी लागते आणि ती सातत्याने कायम ठेवावी लागते.
हे किनारे लोकांसाठी खुले आहेत का?
होय, दोन्ही किनारे सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामूल्य आहे. स्थानिक पातळीवरील व्यवस्थापनानुसार त्यांचा ब्ल्यू फ्लॅग कालावधी १५ ऑक्टोबर ते ३१ मे असा असतो. यामुळे गोव्यातील शांत किनाऱ्यांना भेट देण्याचं आणखी एक मोठं कारण मिळालं आहे. ब्ल्यू फ्लॅग पुरस्कार संबंधित भागात पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देतात.
















