माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना इंडिया आघाडीने उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवडले आहे.
नवी दिल्ली- इंडिया आघाडीने मंगळवारी माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी आपले उमेदवार म्हणून निवडले आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर ही घोषणा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राष्ट्रीय राजधानीत केली. बी सुदर्शन रेड्डी २१ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "बी. सुदर्शन रेड्डी हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रगतीशील न्यायाधिशांपैकी एक आहेत. त्यांची दीर्घ आणि उल्लेखनीय कायदेशीर कारकीर्द आहे, ज्यामध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले आहे. ते सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे सातत्यपूर्ण आणि धाडसी पुरस्कर्ते आहेत. ते गरीबांना न्याय मिळवून देणारे व्यक्ती असून त्यांनी दिलेले अनेक निकाल तुम्ही वाचले तर तुम्हाला कळेल की त्यांनी गरिबांना कसे झुकते माप दिले आहे. संविधान आणि मूलभूत हक्कांचेही त्यांनी संरक्षण केले आहे."
टीएमसी खासदार डेरेक ओ'ब्रायन म्हणाले, "आम आदमी पार्टीसह सर्व विरोधी पक्ष त्यांच्या नावावर सहमत आहेत."
खर्गे यांनी उपराष्ट्रपतीपदाची लढाई ही वैचारिक लढाई असल्याचे म्हटले आणि न्यायमूर्ती रेड्डी यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व विरोधी पक्षांचे आभार मानले.
"ही उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक एक वैचारिक लढाई आहे आणि सर्व विरोधी पक्ष यावर सहमत झाले आहेत आणि म्हणूनच आम्ही बी सुदर्शन रेड्डी यांना संयुक्त उमेदवार म्हणून निवडले आहे," असे खर्गे यांनी पत्रकारांना सांगितले.
न्या. बी सुदर्शन रेड्डी यांचा जन्म ८ जुलै १९४६ रोजी झाला आणि २७ डिसेंबर १९७१ रोजी आंध्र प्रदेशच्या बार कौन्सिलमध्ये हैदराबाद येथे वकील म्हणून नोंदणी झाली. न्या. रेड्डी यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात रिट आणि दिवाणी प्रकरणांमध्ये वकिली केली आणि १९८८-९० दरम्यान उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम केले.
बी सुदर्शन रेड्डी हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्या विरोधात निवडणूक लढवतील.


