सार
ईडीकडून सोमवारी रात्री उशिरा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची बीएमडब्लू (BMW) कार जप्त केली आहे. ईडीचे एक पथक दिल्ली विमानतळावरही नजर ठेवून आहे.
ED Seizes Hemant Soren's Car : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची बीएमडब्लू कार (BMW Car) ईडीच्या पथकाने सोमवारी (29 जानेवारी) रात्री जप्त केली आहे. दिल्लीतील हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाहून कार जप्त करण्यात आली आहे.
ईडीचे पथक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हेमंत सोरेन यांच्या चौकशीसाठी आले होते. पण हेमंत सोरेन घरी नव्हते. ईडीचे अधिकारी दिवसभर हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी थांबले होते तरीही ते आले नाहीत. रात्री उशिरा ईडीच्या अधिकाऱ्यांनी हेमंत सोरेन यांची कार आणि कागदपत्रांनी भरलेली एक बॅग जप्त केली.
जमीन घोटाळ्याप्रकरणी सुरू आहे तपास
ईडीचे अधिकारी सोमवारी सकाळी दिल्लीतील हेमंत सोरेन यांच्या घरी पोहोचले होते. जमीन घोटाळ्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार होती. पण हेमंत सोरेन निवासस्थानी नव्हते.
हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी 13 तास ईडीकडून तपास केला जात होता. ईडीचे एक पथक झारखंड येथील मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचली असता हेमंत सोरेन तेथेही नव्हते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे पथक दिल्ली विमानतळावर हेमंत सोरेन यांना ताब्यात घेण्यासाठी नजर ठेवून आहेत.
27 जानेवारीला दिल्लीत आले होते हेमंत सोरेन
27 जानेवारीला हेमंत सोरेन झारखंडमधील रांची येथून दिल्लीत आले होते. त्यावेळी खासगी कारणास्तव हेमंत सोरेन दिल्लीत जाणार असून लवकर येतील असे सांगण्यात आले होते. झारखंडमधील भाजपने आरोप लावला की, सोरेन 18 तासांपासून बेपत्ता आहेत.
ईडीने 20 जानेवारीला सोरेन यांची चौकशी केली होती. यानंतर ईडीने 29 आणि 31 जानेवारीला हेमंत सोरेन यांना चौकशीसाठी हजर होण्यासाठी समन्स जारी केले होते.
आणखी वाचा :