मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात 'कृष्णा' या हत्तीच्या पिल्लाचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला फळांची खास मेजवानी दिली असून, या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मध्य प्रदेशमधील बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील एक अतिशय गोड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात वनविभागाचे अधिकारी आणि माहूत 'कृष्णा' नावाच्या हत्तीच्या पिल्लाचा पहिला वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत.

कृष्णाचा जन्म १६ ऑक्टोबर २०२५ रोजी झाला. त्याच्या आईचं नाव 'बंधी' आणि वडिलांचं नाव 'राम' आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कृष्णाला त्याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त एक खास सरप्राईज दिलं. त्यांनी त्याला केळी, कलिंगड, गूळ आणि चपाती असा त्याचा सगळ्यात आवडता खाऊ दिला.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी या पिल्लाचं नाव 'कृष्णा' ठेवलं आहे.

या जंगी मेजवानीआधी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कृष्णाला मस्त अंघोळ घातली. माहूतांनी सांगितलं की, कृष्णाने अंघोळीचा आणि त्यानंतर चिखलात लोळण्याचा मनसोक्त आनंद लुटला.

बांधवगड नॅशनल पार्कच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. "जंगलात पहिलं वर्ष पूर्ण! आमचं लाडकं हत्तीचं पिल्लू, कृष्णाला पहिल्या वाढदिवसाच्या (१६ ऑक्टोबर) खूप खूप शुभेच्छा!" असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे.

कृष्णाची काळजी घेणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनीच त्याचं नामकरण केलं होतं. पहिल्याच भेटीत ते या चिमुकल्या पिल्लाच्या प्रेमात पडले होते.

"आमचे आदरणीय मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव सर यांनी हे 'कृष्णा' नाव दिलं आहे. आज बांधवगड व्याघ्र प्रकल्पात छोट्या कृष्णाचा खास दिवस ताजी फळं, गूळ आणि उसापासून बनवलेल्या कस्टमाईज्ड आणि हेल्दी 'केक'सोबत साजरा करण्यात आला. आई आणि केअरटेकर्ससोबतची त्याची मस्ती पाहून आमचं मन भरून आलं!" अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

आतापर्यंत या व्हिडिओला २.२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शेकडो युजर्सनी यावर कमेंट्स केल्या असून, हत्तींची एवढी छान काळजी घेतल्याबद्दल वनविभागाच्या अधिकाऱ्यांचं कौतुक केलं जात आहे.

View post on Instagram
 

एका युजरने लिहिलंय, "कृष्णासोबत हे आनंदाचं वर्ष घालवायला मिळालं, तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात. हॅपी बर्थडे कृष्णा."

तर दुसऱ्या एका युजरने म्हटलंय, "कृष्णावर हे सगळे किती प्रेम करतात ते पाहा. छोट्या कृष्णा, तुला खूप खूप शुभेच्छा."