भारतात चिकन, मटण, मासे खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण तुम्हाला माहित आहे का, देशात अशीही काही ठिकाणं आहेत जिथे कुत्र्याचं मांस खाल्लं जातं. हो, हे खरं आहे. जाणून घेऊया भारताच्या कोणत्या भागात कुत्र्याच्या मांसाला जास्त मागणी आहे.
आपल्या देशात मांसाहार करणारे लोक कोंबडी, बकरा, मासे असं बरंच काही खातात. पण भारतात काही ठिकाणी कुत्र्याचं मांसही खाल्लं जातं, हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. ही काही सिनेमातली गोष्ट नाही, तर खरंखुरं वास्तव आहे.
कुठे खाल्लं जातं कुत्र्याचं मांस?
भारतातील एक सुंदर राज्य असलेल्या नागालँडमध्ये कुत्र्याचं मांस खाण्याची प्रथा आहे. तिथल्या लोकांसाठी हा एक पारंपरिक खाद्यपदार्थ आहे. याशिवाय मणिपूर, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्येही काही समाजगटांमध्ये कुत्र्याचं मांस खाल्लं जातं. नागालँड आणि आसामच्या सीमेवर असलेलं दिमापूर हे शहर कुत्र्याच्या मांसाची सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. 2020 मध्ये नागालँड सरकारने कुत्र्याच्या मांसाच्या विक्रीवर बंदी घातली होती, पण हे प्रकरण सध्या कोर्टात आहे. काही महिन्यांपूर्वी गुवाहाटी हायकोर्टाच्या दोन न्यायाधीशांनी यावर वेगवेगळा निकाल दिला होता.
'या' देशांमध्येही आहे कुत्र्याचं मांस खाण्याची प्रथा
फक्त भारतातच नाही, तर आशिया आणि आफ्रिकेतील काही देशांमध्येही कुत्र्याचं मांस खाल्लं जातं. चीनमध्ये तर काही प्रादेशिक पदार्थांमध्ये कुत्र्याच्या मांसाचा ऐतिहासिक काळापासून वापर होतो. आकडेवारीनुसार, चीनमध्ये दरवर्षी सुमारे 2 कोटी कुत्रे खाल्ले जातात. तिथे 'डॉग मीट फेस्टिव्हल' सुद्धा आयोजित केला जातो. व्हिएतनामच्या काही भागांमध्येही लोक कुत्र्याचं मांस खातात. यामुळे शक्ती मिळते आणि आरोग्य चांगलं राहतं, असा त्यांचा समज आहे.
दक्षिण कोरियामध्येही कुत्र्याचं मांस खाणारे लोक आहेत. कोरिया आणि इंडोनेशियातील काही समुदायांमध्ये तर पारंपरिक जेवणात याचा समावेश असतो. याशिवाय, नायजेरिया आणि घाना या आफ्रिकन देशांमध्येही काही ठिकाणी कुत्र्याचं मांस खाल्लं जातं. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, असा तिथे विश्वास आहे. कंबोडिया, लाओस, फिलिपिन्स आणि स्वित्झर्लंडच्या काही भागांमध्येही मर्यादित प्रमाणात कुत्र्याचं मांस खाल्लं जात असल्याचं समोर आलं आहे.
