Kerala Election Rally : देवेंद्र फडणवीस यांनी केरळमधील सभेत एनडीएला संधी मिळाल्यास कोचीला औद्योगिक हब बनवणे, पाणीटंचाई दूर करणे आणि विकास प्रकल्प राबवण्याचे आश्वासन दिले. याचवेळी त्यांनी एलडीएफ आणि यूडीएफवर विकास रोखल्याचा आरोप करत जोरदार टीका केली.

Kerala Election Rally : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केरळमधील निवडणूक प्रचारादरम्यान एनडीए सरकारला संधी दिल्यास राज्यात मोठ्या प्रमाणावर विकास घडवून आणण्याचे आश्वासन दिले. त्रिपुनिथुरा येथे आयोजित सभेत त्यांनी औद्योगिक, पायाभूत आणि पाणीपुरवठा प्रकल्पांबाबत महत्त्वाच्या घोषणा केल्या.

कोचीला औद्योगिक शक्तीकेंद्र बनवण्याचा संकल्प

त्रिपुनिथुरा येथील सभेत बोलताना फडणवीस यांनी कोची शहराला औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा एनडीएचा मानस स्पष्ट केला. बंगळूरू आणि कोची यांना जोडणारा औद्योगिक कॉरिडॉर उभारण्याची योजना त्यांनी मांडली. यामुळे रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

पाणीटंचाईवर तोडगा काढण्याचे आश्वासन

त्रिपुनिथुरा परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवरही एनडीए सरकार ठोस उपाययोजना करेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. स्थानिक नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देत विकासकामे राबवली जातील, असेही त्यांनी नमूद केले.

केंद्राच्या विकासकामांचा उल्लेख

मोदी सरकारच्या विकास प्रकल्पांचा दाखला देताना त्यांनी विझिंजम बंदराच्या बांधकामाचा उल्लेख केला. केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांमुळे देशभरात पायाभूत सुविधा मजबूत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

एलडीएफ-यूडीएफवर टीका

एलडीएफ आणि यूडीएफ या दोन्ही आघाड्यांवर टीका करत फडणवीस म्हणाले की, त्यांनी केरळमधील विकास प्रक्रियेला अडथळा आणला आहे. “राज्यात एकमेकांशी लढणारे पक्ष दिल्लीत मात्र एकत्र येतात,” असा आरोपही त्यांनी केला.

रोडशो आणि प्रचार मोहीम

फडणवीस यांनी मराडू न्यूक्लियस मॉल ते त्रिपुनिथुरा दरम्यान रोडशोमध्ये सहभाग घेतला. यावेळी ट्वेंटी20 चे अध्यक्ष साबू एम जेकब, उमेदवार अंजली नायर आणि इतर नेतेही उपस्थित होते. प्रचारसभेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.

Scroll to load tweet…