माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १९ डिसेंबरला 'राजकीय भूकंप' आणि 'मराठी पंतप्रधान' होण्याचे भाकीत केले आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपने आपल्या सर्व खासदारांना १९ डिसेंबरपर्यंत संसदेत उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे. 

नवी दिल्ली : देशाच्या राजकारणाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये सध्या उच्च तापमानाचा राजकीय थरार अनुभवला जात आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १९ डिसेंबरच्या 'राजकीय भूकंपा'ची आणि 'मराठी माणूस पंतप्रधान' होण्याच्या भाकीताची घोषणा केली आहे. या भविष्यवाणीमुळे देशाच्या राजकारणात खळबळ माजली असतानाच, दुसरीकडे भाजपच्या गोटात लक्षवेधी हालचालींना वेग आला आहे.

चव्हाणांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असतानाच, सत्ताधारी भाजपने तातडीने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने आपल्या सर्व खासदारांसाठी व्हिप (Whipped) जारी केला असून, आज (१५ डिसेंबर) पासून १९ डिसेंबरपर्यंत संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे.

व्हिप का जारी केला गेला? 'भूभागा'चं खरं कारण काय?

भाजपने व्हिप जारी करण्यामागे 'महत्त्वाची विधेयकं' हे अधिकृत कारण दिलं आहे. हिवाळी अधिवेशन आता अंतिम टप्प्यात आहे. पुढील चार दिवसांत काही महत्त्वाची आणि धोरणात्मक विधेयकं सभागृहात मांडली जाणार आहेत. यात अणु ऊर्जा विधेयक सर्वात महत्त्वाचे मानले जात आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास खासगी क्षेत्रासाठी अणु ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होईल. तसेच कॉर्पोरेट आणि उच्च शिक्षणाशी संबंधित विधेयकांवरही चर्चा अपेक्षित आहे.

गेल्या काही दिवसांपासून संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू आहे. वंदे मातरम् आणि निवडणूक सुधारणा यांसारख्या मुद्द्यांवरून वादळी चर्चा झाली आहे. काल, काँग्रेसच्या दिल्लीतील रॅलीतील वक्तव्यावरूनही सदनात गोंधळ झाला, ज्यामुळे कामकाज थांबवावे लागले.

या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, भाजपला कोणतीही जोखीम नको असल्याने, महत्त्वाच्या विधेयकांना विरोधकांच्या अनुपस्थितीत किंवा कमी मतांमुळे धक्का बसू नये यासाठी व्हिप जारी केल्याचे मानले जात आहे. मात्र, चव्हाण यांच्या भाकीताच्या बरोबर याच काळात व्हिप जारी झाल्याने, अनेक राजकीय तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. पुढचे ४ दिवस राजधानी दिल्लीत होणाऱ्या प्रत्येक हालचालींवर देशातील नागरिकांचे आणि राजकारण्यांचे लक्ष लागून राहिले आहे.