Jeweler Saves customer With CPR : जयपूरमधील एका ज्वेलरी दुकानात व्यावसायिक चर्चा करत असताना रत्न व्यापारी राजकुमार सोनी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. पण, ज्वेलरी मालकाचा मुलगा वरुण जैन याने तात्काळ CPR देऊन त्यांचे प्राण वाचवले.  

Jeweler Saves customer With CPR : खरंच मृत्यूचं काही सांगता येत नाही असं म्हणतात ते खरं आहे. मृत्यू एखाद्या व्यक्तीला कधी गाठेल हे खरंच सांगता येत नाही. एक व्यक्ती सोनाराकडे गेला. तो सोनारासोबत बोलत होता. यावेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला. सुरवातीला कोणालाच काही समजले नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली आहे. तो व्हिडिओ म्हणजे जणू मृत्यूला समोर पाहण्यासारखा होता. पण मृत्यूच्या दारातून त्याला पुन्हा जीवनात परत आणण्यात आले. जयपूरच्या रामपुरा बाजारातील वर्धमान ज्वेलर्समधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्वेलरी दुकानात मालकाशी व्यावसायिक चर्चा करत असताना एका रत्न व्यापाऱ्याला छातीत दुखू लागले आणि ते हळूहळू मृत्यूच्या दिशेने झुकत होते. मात्र, ज्वेलरी मालकाच्या मुलाच्या प्रसंगावधानाने त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून जीवदान दिले.

मृत्यूच्या दारातून जीवनाकडे

जयपूरमधील ६० वर्षीय रत्न व्यापारी राजकुमार सोनी यांना वर्धमान ज्वेलर्समध्ये छातीत दुखू लागले. ही घटना ११ डिसेंबर, गुरुवारी दुपारी १:५८ च्या सुमारास घडली. ज्वेलरी काउंटरवर व्यावसायिक चर्चा करत असताना राजकुमार यांना छातीत दुखायला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी हळूच समोरच्या डिस्प्ले डेस्कवर हात ठेवून मान टेकवली. त्यांना अचानक असं वाकलेलं पाहून ज्वेलरीतील कर्मचारी आणि मालकाचा मुलगा वरुण जैन लगेच पुढे आले. त्यानंतर, त्यांनी राजकुमार यांना जमिनीवर झोपवून त्यांच्या छातीवर दाब देऊन CPR दिला. सुमारे अडीच मिनिटे CPR दिल्यानंतर त्यांनी डोळे उघडले आणि ते उठून बसले. आपल्याला छातीत दुखू लागले आणि त्यानंतर काहीही आठवत नाही, असे त्यांनी नंतर सांगितले. प्रथमोपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Scroll to load tweet…

कौतुकाचा वर्षाव

हा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होताच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. वरुणच्या प्रसंगावधानाचे अनेकांनी कौतुक केले, तर अनेकांनी वरुणला सलाम करत असल्याचे लिहिले. काहींनी लिहिले की, अशा वेळी योग्य कृती केल्यामुळे एक जीव वाचू शकला. त्याचवेळी, वरुणची CPR देण्याची पद्धत अशास्त्रीय असल्याची टीकाही झाली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सामान्य लोकांना योग्य प्रकारे CPR कसा द्यावा हे शिकवण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.