कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत डिपके यांना दिल्ली पोलिसांनी त्यांच्या आजीच्या निधनाची बातमी दिली. तसेच त्यांना गावी जाण्यासाठी मदतीची ऑफरही दिली. मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी डिपके यांच्यासह १००० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत डिपके सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांनी त्यांना त्यांच्या आजीच्या निधनाची बातमी दिली. माणुसकीच्या नात्याने त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी शक्य ती सर्व मदत करण्याची ऑफरही पोलिसांनी दिली आहे. जंतरमंतरवर सीजेपीने आंदोलनाची हाक दिली होती. पण या आंदोलनाला परवानगी नव्हती, त्यामुळे डिपके यांना ताब्यात घेण्यात आलं, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजीच्या निधनाची बातमी डिपके यांना अत्यंत संवेदनशीलतेने देण्यात आली. तसेच अंत्यसंस्काराच्या वेळेबद्दलही त्यांना सांगण्यात आलं. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या त्यांच्या गावी आजीचं निधन झालं. वाढतं वय आणि दीर्घ आजारपणामुळे त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या.

सीजेपीच्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणावर धरपकड

दुसरीकडे, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीने जंतरमंतरवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आतापर्यंत देशभरातून आलेल्या सुमारे १००० आंदोलकांना दिल्लीत ताब्यात घेण्यात आलं आहे, अशी माहिती शनिवारी दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली.

विमानातूनच ताब्यात घेतल्याचा सीजेपी संस्थापकाचा आरोप

या धरपकडीदरम्यान, आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईहून दिल्लीला गेलेले सीजेपीचे कार्यकर्ते अभिजीत डिपके यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. दिल्ली विमानतळावर विमानातून उतरत असतानाच पोलिसांनी आपल्याला आणि आपल्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप त्यांनी केला. या व्हिडिओमध्ये डिपके सांगत आहेत की, पोलीस कर्मचारी थेट विमानात घुसले आणि त्यांनी आम्हाला पकडण्याचा प्रयत्न केला.

"तुम्ही पाहू शकता की दिल्ली पोलीस आम्हाला अटक करण्यासाठी थेट विमानात शिरत आहेत. ते सगळे विमानात येत आहेत. आम्ही नुकतेच लँड झालोय. दिल्ली पोलिसांचे सर्व अधिकारी इथं उभे आहेत. ते आम्हाला विमानातूनच अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण दिल्ली पोलीस विमानात चढत आहेत... ही नरेंद्र मोदींची भीती आहे... आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनीही असं केलं नव्हतं. आम्हाला फक्त शांततापूर्ण आंदोलन करायचं होतं, पण ते आम्हाला गुन्हेगारांसारखं विमानातून उचलत आहेत," असं डिपके या व्हिडिओत म्हणाले.

त्यांनी पुढे आरोप केला की, "देश कुठे चाललाय हे तुम्ही पाहू शकता. ते आम्हाला थेट विमानातून अटक करण्यासाठी आले आहेत. असं तर इंदिरा गांधींनीही केलं नव्हतं. ही हुकूमशाही आहे, जिथे दिल्ली पोलीस विमानात घुसून आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत. या, आम्हाला अटक करा. आम्ही इथे अटक करून घेण्यासाठीच आलो आहोत. या, आम्हाला अटक करा... आम्ही तुम्हाला घाबरत नाही."

भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) विरोधात सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाची हाक दिल्याने, याआधीच दिल्लीत अनेक ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. दिल्लीच्या सर्व प्रवेशद्वारांवर सुरक्षा वाढवण्यात आली होती, तर ४६ मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे.

(हेडलाईन वगळता या बातमीतील मजकूर एशियानेट न्यूजच्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेला नाही, ही बातमी सिंडिकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)