Delhi Earthquake : दिल्ली-NCR, हरियाणातील झज्जर व रोहतक भागात सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे झटके जाणवले. शुक्रवारी संध्याकाळी ७:४९ वाजता झज्जर परिसरात ३.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. २ दिवसांत सलग २ वेळा हादरे जाणवल्यामुळे नागरिकांत भीतीचं वातावरण आहे.
नवी दिल्ली : दिल्ली-NCRसह हरियाणातील झज्जर व रोहतक भागात सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे झटके जाणवले. या झटक्यांची तीव्रता रिक्टर स्केलवर 3.7 इतकी नोंदवली गेली असून, भूकंपाचा केंद्रबिंदू झज्जर येथे असल्याची माहिती आहे. अचानक आलेल्या या हादऱ्यांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. अनेकजण घाबरून घराबाहेर पडले.
कधी आणि कुठे जाणवले झटके?
नेशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (NCS) च्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ७:४९ वाजता झज्जर परिसरात भूकंप झाला. या भूकंपाची खोली १० किमी इतकी होती. दिल्लीपासून केवळ ६० किमी अंतरावर असलेल्या झज्जरमध्ये हा भूकंप जाणवला. याआधी गुरुवारी सकाळी ९:०४ वाजता देखील झज्जर आणि दिल्लीमध्ये 4.4 तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्या वेळी तब्बल १० सेकंदांपर्यंत झटके जाणवले होते. दोन दिवसांत सलग दोन वेळा हादरे जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
भूकंपाची तीव्रता आणि संभाव्य धोका
गुरुवार (10 जुलै) : तीव्रता – 4.4
शुक्रवार (11 जुलै) : तीव्रता – 3.7
यात कोणत्याही प्रकारची जिवीत वा वित्तहानी झाली नसल्याचं प्राथमिक माहितीमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
भूकंप का होतोय या भागात?
विशेषज्ञांच्या मते, दिल्ली-NCR आणि झज्जर हे भाग भूकंप संवेदनशील क्षेत्रात येतात. येथे अनेक सक्रिय फॉल्ट लाईन्स आहेत, ज्या भूगर्भीय हालचालींना कारणीभूत ठरतात. यात विशेषतः खालील फॉल्ट्स महत्त्वाचे आहेत.
महेंद्रगढ़–देहरादून फॉल्ट (MDF)
दिल्ली–हरिद्वार रिज (DHR)
दिल्ली–सरगोधा रिज (DSR)
सोहना फॉल्ट
मथुरा फॉल्ट
महेंद्रगढ़–देहरादून फॉल्ट ही अत्यंत सक्रिय फॉल्ट लाईन असून ती दिल्लीसह घनदाट लोकवस्तीच्या परिसरातून जाते. तिथे जमिनीखाली तणाव सातत्याने वाढत असल्यामुळे या भागात वारंवार भूकंपाचे झटके जाणवतात.
विशेषज्ञांचा इशारा, भूकंप सुरक्षा नियमांचे पालन करा!
भूगर्भशास्त्रज्ञांनी सांगितले की, असे मध्यम तीव्रतेचे भूकंप हे मोठ्या भूकंपापूर्वीचे संकेत असू शकतात. त्यामुळे, विशेषतः बहुमजली इमारतींमध्ये राहणाऱ्यांनी भूकंप सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हे झटके कितीही सौम्य वाटले, तरी भविष्यातील धोक्याची चाहूल मानून सतर्क राहणे गरजेचे आहे.


