राधिका यादव ही फक्त एक टेनिस खेळाडू नव्हती, तर ती स्वतःची टेनिस अकादमीही चालवत होती. घटनेच्या वेळी ती स्वयंपाक करत होती, आणि त्याचवेळी तिच्या वडिलांनी तिच्यावर गोळीबार केला.
गुरुग्राम - हरियाणातील गुरुग्राम शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सेक्टर ५७, सुषांत लोक येथील घरात गुरुवारी २५ वर्षीय नवोदीत टेनिसपटू राधिका यादव हिची तिच्याच वडिलांनी गोळी झाडून हत्या केली. राधिका यादव ही फक्त एक टेनिस खेळाडू नव्हती, तर ती स्वतःची टेनिस अकादमीही चालवत होती. घटनेच्या वेळी ती स्वयंपाक करत होती, आणि त्याचवेळी तिच्या वडिलांनी तिच्यावर गोळीबार केला.
परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडल्या
आरोपी दीपक यादव (वय ४९) यांनी आपल्या परवानाधारक .३२ बोरच्या रिव्हॉल्व्हरमधून अनेक गोळ्या झाडल्या. त्यापैकी तीन गोळ्या राधिकाला लागल्या आणि ती जागीच मरण पावली. गुरुग्राम पोलिसांनी दीपक यादव यांना तातडीने अटक केली असून, त्यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचे निवेदन
गुरुग्राम पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी (PRO) संदीप कुमार यांनी घटनेची पुष्टी करत सांगितले की, “टेनिसपटू राधिका यादव हिचा तिच्या वडिलांनी गोळ्या झाडून खून केला आहे. गोळ्या त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून झाडण्यात आल्या. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.”
संदीप कुमार यांनी पुढे सांगितले की, “राधिका टेनिस अकादमी चालवत होती. तिचे वडील या गोष्टीवर नाराज होते आणि त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत असे.”
अकादमीवर वडिलांचा आक्षेप
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, राधिका टेनिस अकादमी चालवत असल्याने वडील दीपक यादव नाराज होते. अनेक दिवसांपासून या गोष्टीवरून घरात वाद होत होते. अकादमीमुळे तिच्या वडिलांना शेजारचे टोमणे मारायचे. मुलीच्या पैशांवर हा माणूस जगतोय असे सतत म्हणायचे. त्यामुळे त्यांनी तिला अकादमी बंद करण्यास सांगितले होते. परंतु, ती ही अकादमी बंद करत नव्हती. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये वाद झाला आणि त्याच रागातून दीपक यादव यांनी राधिकावर गोळीबार केला. आरोपी दीपक यादव यांनी पोलिस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून, ते सध्या पोलिस कोठडीत आहेत.
तक्रार आरोपीच्या भावाकडून
या खुनाची तक्रार दीपक यादव यांचे भाऊ कुलदीप यादव यांनी दाखल केली आहे. ते याच घराच्या तळमजल्यावर राहतात. घटनेच्या वेळी राधिकाची आईही घरातच उपस्थित होती.
राधिकाचा टेनिस क्षेत्रातील प्रवास
राधिका यादव ही भारतीय टेनिसमधील एक नवोदीत स्टार होती. २३ मार्च २००० रोजी जन्मलेली राधिका आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या (ITF) महिला दुहेरी क्रमवारीत झपाट्याने पुढे गेली होती. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी तिची सर्वोच्च कारकीर्द क्रमवारी ११३ अशी होती. तसेच ती हरियाणाच्या महिला दुहेरी क्रमवारीत पाचव्या स्थानावर होती.
या भीषण घटनेने संपूर्ण टेनिस जगतात आणि क्रीडाप्रेमी समाजात शोककळा पसरली आहे. एक होतकरू खेळाडू, जी देशाचे भवितव्य उज्ज्वल करू शकली असती, तिचा आयुष्याच्या प्रारंभातच मृत्यू झाला. कौटुंबिक मतभेद इतके टोकाला जाऊ शकतात, हे या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
गुरुग्राम पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीविरोधात कडक कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत. राधिकाच्या मृत्यूनंतर तिच्या अकादमीतील विद्यार्थी, प्रशिक्षक, आणि टेनिसप्रेमी हळहळ व्यक्त करत आहेत.
समाजात अशा घटना रोखण्यासाठी आणि कुटुंबातील संवाद व समजूत वाढवण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे, हे या दुर्दैवी घटनेने अधोरेखित केले आहे.


