बुधवारी सकाळी सिव्हिल लाइन्स येथील आपल्या अधिकृत निवासस्थानी 'जनसुनवाई' कार्यक्रमात दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.

नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आज बुधवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी आयोजित जनसुनवाईदरम्यान एका व्यक्तीने अचानक हल्ला केला. भाजप नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात मुख्यमंत्र्यांना कानशिलात लगावण्यात आली तसेच त्यांना केस धरुन ओढण्यात आले. दरम्यान, त्यांच्या कानशिलात लगावणाऱ्याचा फोटो आणि नाव समोर आले आहे. 

सिव्हिल लाइन्स पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने त्याचं नाव राजेशभाई खिमजीभाई साकरिया असं असल्याचं सांगितलं आहे. ४१ वर्षीय राजेश गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी आहे. त्याची अधिक चौकशी केली जात आहे. त्याचे नातलग सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी तो प्रयत्न करतोय. याबाबत रेखा गुप्ता यांच्याशी चर्चा करण्यासाठी तो गेला होता. 

Scroll to load tweet…

घटनेनंतर मुख्यमंत्री गुप्ता यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी धाव घेत निवासस्थानाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेशभाई साकरिया जनसुनवाईस तक्रारदार म्हणून हजर झाला होता. परंतु अचानक त्याने मुख्यमंत्री गुप्ता यांच्यावर हल्ला चढविला. सुरक्षारक्षकांनी त्वरित त्या व्यक्तीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याची चौकशी सुरू आहे.

दर आठवड्याला मुख्यमंत्री गुप्ता या जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आपल्या निवासस्थानी ‘जनसुनवाई’ आयोजित करतात. आजच्या बैठकीत घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजपचे वरिष्ठ नेते हरीश खुराना यांनी सांगितले, “जनसुनवाई दरम्यान एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला. सध्या डॉक्टर त्यांची तपासणी करत आहेत. हा हल्ला राजकीय हेतूने झाला का, याची चौकशी व्हायला हवी. आम्ही या प्रकाराचा तीव्र निषेध करतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या हल्ल्यानंतर राजधानीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुख्यमंत्रींच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटींवर आता चौकशीची मागणी जोर धरत आहे.