दिल्लीत हवेचा दर्जा थोडा सुधारला असून AQI १६४ वर पोहोचला आहे. पण दुसरीकडे यमुनेच्या पात्रात पुन्हा एकदा विषारी पांढरा फेस साचल्याने दिल्लीकरांसमोर दुहेरी संकट उभं राहिलं आहे.
मुंबई : सोमवारी सकाळी ७ वाजता दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) १६४ नोंदवला गेला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) माहितीनुसार, दिल्लीची हवा आता 'मध्यम' श्रेणीत आली असून त्यात थोडी सुधारणा दिसली आहे. शहरातील ६० पैकी ५५ मॉनिटरिंग स्टेशन्सची आकडेवारी समोर आली असून, यातील ३० ठिकाणी PM2.5 हा मुख्य प्रदूषक घटक असल्याचं स्पष्ट झालं आहे.
जहांगीरपुरीमध्ये सर्वात जास्त म्हणजे २४६ AQI नोंदवला गेला. त्याखालोखाल विवेक विहार (२३५), सीआरआरआय मथुरा रोड (२३१), पंजाबी बाग (२२५) आणि आर के पुरम (२२३) यांचा नंबर लागतो. ही पाचही स्टेशन्स 'वाईट' (Poor) श्रेणीत आहेत. जहांगीरपुरी, विवेक विहार, पंजाबी बाग आणि आर के पुरममध्ये PM2.5 चं प्रमाण जास्त होतं, तर सीआरआरआय मथुरा रोडवर PM10 चं प्रमाण सर्वाधिक होतं.
दिल्ली-एनसीआरसमोरील पर्यावरणीय आव्हाने
सध्या दिल्ली-एनसीआर दुहेरी संकटाचा सामना करत आहे. कालिंदी कुंजजवळ यमुना नदीच्या पात्रात पुन्हा एकदा विषारी पांढरा फेस साचला आहे. रविवारी दिल्लीचा एकूण AQI १६८ वर पोहोचला होता. PM2.5 आणि PM10 हेच मुख्य प्रदूषक घटक राहिले आहेत. शहरातील वेगवेगळ्या भागात प्रदूषणाची पातळी वेगवेगळी आहे. पीजीडीएव्ही कॉलेज, श्रीनिवासपुरी इथे AQI ११० च्या आसपास होता, तर इतर अनेक ठिकाणी तो ११८ ते १८० च्या पुढे गेला होता.
सरकारची पावलं आणि नदीतील प्रदूषण
वाढत्या प्रदूषणामुळे कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटने (CAQM) २१ ऑक्टोबरलाच दिल्ली-एनसीआरमध्ये 'ग्रॅप'चा (GRAP) पहिला टप्पा लागू केला आहे. या नियमानुसार हॉटेल, रेस्टॉरंट आणि उघड्यावर चालणाऱ्या खानावळींमध्ये तंदूरसाठी कोळसा आणि लाकूड जाळण्यावर बंदी घातली आहे. तसेच, डिझेल जनरेटरचा वापर फक्त अत्यावश्यक कामांसाठीच करता येईल.
कालिंदी कुंज परिसरातून समोर आलेल्या व्हिज्युअल्समध्ये नदीच्या पाण्यावर विषारी पांढऱ्या फेसाचा मोठा थर तरंगताना दिसत आहे. यामुळे नदीतील प्रदूषणाचा प्रश्न किती गंभीर आहे, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी नदी स्वच्छ करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचं कौतुक केलं होतं. सुमारे ९,००० कोटी रुपयांच्या मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांचं उद्घाटन करताना त्यांनी हा दिल्लीकरांसाठी "आनंदाचा दिवस" असल्याचं म्हटलं होतं.


