हेपा (HEPA) फिल्टर असलेले एअर प्युरिफायर घरातील हवेतील पीएम २.५, धूळ आणि परागकण शोषून घेतात. या प्रदूषणामुळे श्वसनाचा, दम्याचा आणि ॲलर्जीचा त्रास वाढू शकतो.

मुंबई : दिवाळीच्या काळात बाहेरचं प्रदूषण वाढतं, तेव्हा घरातील हवेचा दर्जा हा चिंतेचा विषय बनतो. बाहेरच्या हवेपेक्षा घरातील हवा अधिक शुद्ध असते, हा लोकांचा मोठा गैरसमज आहे. वाहनांचा धूर, बांधकाम, धुके आणि अगदी रोजच्या घरकामांमुळे घरातील हवाही मोठ्या प्रमाणात प्रदूषित होऊ शकते.

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी एअर प्युरिफायर, घरात लावायची झाडे आणि खेळती हवा या गोष्टी नेहमी सुचवल्या जातात, पण त्यांचा फायदा किती होतो हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असते.

एअर प्युरिफायर खरंच प्रदूषण कमी करतात का?

हेपा (HEPA) फिल्टर असलेले एअर प्युरिफायर घरातील हवेतील पीएम २.५, धूळ, परागकण आणि ॲलर्जी वाढवणारे घटक कमी करू शकतात. या प्रदूषणामुळे श्वसननलिकेत जळजळ होऊन दमा, ॲलर्जिक रायनायटिस आणि सीओपीडीचा (COPD) धोका वाढू शकतो. योग्य क्लीन एअर डिलिव्हरी रेट (CADR) असलेले प्युरिफायर निवडणे खूप महत्त्वाचे आहे. ॲक्टिव्हेटेड कार्बन फिल्टर असलेले प्युरिफायर काही विषारी वायू कमी करतात. तरीही, एअर प्युरिफायर घरातील १००% प्रदूषण नष्ट करू शकत नाहीत.

घरात लावलेली झाडे हवा शुद्ध करतात का?

नैसर्गिक एअर फिल्टर म्हणून झाडे लावली जातात, पण ती हवा शुद्ध करण्यात फारशी मदत करत नाहीत. प्रयोगातून असे दिसते की काही झाडे हवेतील रसायने शोषून घेतात, पण पूर्ण हवा शुद्ध करण्यासाठी ते प्रमाण पुरेसे नसते. झाडांना जास्त पाणी दिल्यास कुंडीत बुरशी वाढू शकते आणि त्यामुळे ॲलर्जी व दम्याचा त्रास अधिक वाढू शकतो.

खेळती हवा का आवश्यक आहे?

घरात हवा खेळती राहिल्यास ताज्या हवेमुळे प्रदूषणाची पातळी कमी होते. बाहेर प्रदूषण कमी असताना खिडक्या उघड्या ठेवणे गरजेचे आहे. धूर आणि आर्द्रता बाहेर काढण्यासाठी किचन चिमणी आणि एक्झॉस्ट फॅन खूप उपयुक्त ठरतात. पण जर बाहेर जास्त प्रदूषण असेल, तर मात्र खिडक्या बंद ठेवणेच शहाणपणाचे आहे.

या सोप्या सवयी बदलतील तुमचे जीवन

घरातील प्रदूषण टाळण्यासाठी त्याच्या मूळ कारणांवर लक्ष देणे गरजेचे आहे. घरात धूम्रपान करू नये, अगरबत्ती किंवा डास पळवणाऱ्या कॉइलचा वापर टाळावा. एरोसोलचा वापर कमी करा आणि स्वयंपाकघरात हवा खेळती राहील याची काळजी घ्या. ओल्या कपड्याने पृष्ठभाग पुसून आणि व्हॅक्यूम करून धुळीवर नियंत्रण मिळवता येते.

थोडक्यात सांगायचे तर, घरातील हवा शुद्ध ठेवण्यासाठी प्रदूषणाचे स्रोत थांबवणे, हवा फिल्टर करणे आणि हवा खेळती ठेवणे या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एअर प्युरिफायर नक्कीच थोडी अधिक सुरक्षा देतील, पण घरात प्रदूषणमुक्त हवा राहील याची १०० टक्के गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही.

डॉ. अंकिता तेजा नारायण, कन्सल्टंट – इंटरनल मेडिसिन, किम्स (KIMS) हॉस्पिटल्स, इलेक्ट्रॉनिक सिटी, बंगळुरू