राजकारणात वर्षानुवर्षे सक्रिय राहिल्यानंतर आता पश्चिम बंगाल भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष ६१ व्या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत.
दिलीप घोष रिंकू मजूमदार सोबत लग्न करणार असल्याची खरमरीत चर्चा सुरु झाली आहे. राजकारणात वर्षानुवर्षे सक्रिय राहिल्यानंतर आता पश्चिम बंगाल भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आयुष्याची नवी इनिंग सुरू करणार आहेत. ६१ व्या वर्षी ते लग्नबंधनात अडकणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते शुक्रवारी म्हणजेच आज लग्न करणार आहेत. कोलकातातील न्यू टाउन येथील त्यांच्या घरी हा विवाहसोहळा पार पडणार असून त्यात केवळ कुटुंबातील जवळचे लोक उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा पूर्णपणे कौटुंबिक आणि खाजगी असेल. चला तर मग, जाणून घेऊयात दिलीप घोष यांची होणारी पत्नी आहे तरी कोण…
लग्नबंधनात अडकणार दिलीप घोष
दिलीप घोष ज्यांच्याशी लग्न करणार आहेत त्या त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांचे नाव रिंकू मजूमदार आहे आणि त्या भाजपच्या नेत्या आहेत. रिंकू दक्षिण कोलकातामध्ये भाजप महिला मोर्चाशी संबंधित आहेत. त्या आधीच घटस्फोटित आहेत. त्यांना २६ वर्षांचा मुलगा आहे, जो आयटी क्षेत्रात काम करतो. रिंकू आणि दिलीप यांची पहिली भेट पक्षाच्या कार्यक्रमात झाली होती. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर ही मैत्री प्रेमात बदलली.
हे देखील वाचा: ईडीच्या जाळ्यात राहुल-सोनिया, आरोपपत्रावर हरदीप पुरी म्हणाले- भ्रष्टाचार आणि फसवणुकीचा प्रकरण
खाजगी समारंभात होणार लग्न
दोघांच्या लग्नाची चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा गुरुवारी तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिलीप घोष यांना शुभेच्छा दिल्या. सुरुवातीला लोकांना वाटले की हा विनोद आहे. पण नंतर कुणाल घोष यांनी स्पष्ट केले की ही बातमी खरी आहे. त्यांनी सांगितले की हे लग्न पूर्णपणे खाजगी समारंभात होत आहे. तसेच त्यांनी लोकांना आवाहन केले की या प्रकरणात राजकारण करु नका कारण हा दिलीप घोष यांचा वैयक्तिक निर्णय आहे.


