Bihar Doctor Nusrat Parveen Gets Job Offer : नितीश कुमार यांनी हिजाब काढल्यामुळे वादात सापडलेल्या डॉ. नुसरत परवीन पाटण्यातील नोकरीवर रुजू झालेल्या नाहीत. या राज्य सरकारने त्यांना चांगल्या पगाराची नोकरी देऊ केली आहे.
Bihar Doctor Nusrat Parveen Gets Job Offer : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हिजाब काढल्याच्या घटनेमुळे वादात सापडलेल्या डॉ. नुसरत परवीन अद्याप कामावर रुजू झालेल्या नाहीत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत त्यांनी ड्युटीसाठी रिपोर्ट केले नाही, परंतु कामावर रुजू होण्याची अंतिम मुदत २० डिसेंबरनंतरही वाढवण्यात आली आहे, असे पाटण्याचे सिव्हिल सर्जन अविनाश कुमार सिंह यांनी स्पष्ट केले. पाटणा सदर येथील सबलपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नुसरत यांची नियुक्ती झाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी डॉक्टरचा हिजाब काढला होता.
यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला असला तरी, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी या घटनेचा बचाव केला आहे. मुख्यमंत्री आणि विद्यार्थिनी यांच्यातील संबंध वडील आणि मुलीच्या प्रेमासारखे पाहावेत, यात वादाचा कोणताही मुद्दा नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, नुसरत यांचे कुटुंब मुख्यमंत्री किंवा सरकारवर नाराज नाही, असे नुसरत परवीन शिकत असलेल्या गव्हर्नमेंट तिब्बी कॉलेजचे प्राचार्य महफूजूर रहमान यांनी सांगितले.
मात्र, माध्यमांमध्ये या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असल्याने ते निराश आहेत. त्यांचे कुटुंब माध्यमांपासून दूर राहू इच्छिते आणि नुसरत यांनी नोकरीवर रुजू व्हावे की उच्च शिक्षण सुरू ठेवावे, यावर विचार सुरू आहे, असेही ते म्हणाले. निषेध म्हणून कुटुंब कोलकात्याला गेल्याच्या बातम्या त्यांनी फेटाळून लावल्या.
नुसरतला झारखंडमध्ये नोकरीची ऑफर
दरम्यान, शेजारील राज्य झारखंडचे आरोग्य मंत्री इरफान अन्सारी यांनी नुसरतला झारखंडमध्ये नोकरीची ऑफर दिली आहे. त्यांनी दरमहा तीन लाख रुपये पगार, सरकारी फ्लॅट आणि पूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. नितीश कुमार यांची कृती मुस्लिम समाजाचा अपमान करणारी आहे, असा आरोप त्यांनी केला. मात्र, भाजपने या ऑफरला तुष्टीकरणाचे राजकारण म्हटले आहे. झारखंडमधील तरुणांना नोकरी न देता बिहारमधील डॉक्टरला कोणत्या धोरणानुसार नोकरी दिली जात आहे, असा सवाल भाजप नेते भानू प्रताप साही यांनी केला आहे. या घटनेप्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्याने नितीश कुमार यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.


