एका इन्स्टाग्राम युझरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात मुख्य रस्त्यावर तर ट्रॅफिक आहेच, पण शेजारच्या सोसायटीच्या आतही गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसत आहे.
बंगळुरू: बंगळुरूच्या ट्रॅफिकची चर्चा नेहमीच असते, पण आता हे ट्रॅफिक थेट लोकांच्या घरापर्यंत पोहोचलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका सोसायटीच्या आतच गाड्यांची मोठी रांग लागल्याचं दिसत आहे. एका इन्स्टाग्राम युझरने तिच्या घराबाहेरच्या रस्त्यावरचं ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद केलं आणि त्यानंतर शेजारच्या सोसायटीत अडकलेल्या गाड्याही दाखवल्या.
हा व्हिडिओ शनिवारी दुपारी २ च्या सुमारास रेकॉर्ड केल्याचं सांगितलं जात आहे. या महिलेने तिच्या रूममधून आधी मुख्य रस्त्यावरची गर्दी शूट केली आणि मग सोसायटीच्या गेटजवळ बाहेर पडण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या गाड्यांवर कॅमेरा फोकस केला.
या महिलेच्या सांगण्यानुसार, मुख्य रस्त्यावर पोहोचण्याआधीच लोकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे. सोसायटीच्या गेटवरच गाड्यांची एवढी गर्दी होती की, काही रहिवाशांना सोसायटीच्या बाहेर पडायलाच तब्बल ३० मिनिटे लागली.
हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युझर्सही थक्क झाले आहेत. बंगळुरूच्या ट्रॅफिकची ही अवस्था पाहून अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. 'बंगळुरूमध्ये आता ट्रॅफिक थेट लोकांच्या घराच्या दारातच येऊन उभं राहतं', अशी खिल्ली काही युझर्सनी उडवली आहे.
