Bengaluru Cab Driver Rape Case : बंगळूरूमध्ये एका तरुणीने कॅब ड्रायव्हरवर सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली होती. मात्र, बाणसवाडी पोलिसांच्या तपासात दोघांची आधीपासून ओळख असल्याचे उघड झाले आहे.
Bengaluru Cab Driver Rape Case : शहरात एका तरुणीने कॅब ड्रायव्हरवर बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली होती, या प्रकरणाला तपासादरम्यान एक महत्त्वाचे वळण मिळाले आहे. पीडित तरुणीने सुरुवातीला कॅब ड्रायव्हर आणि त्याच्या मित्रावर सामूहिक बलात्कार (गँगरेप) केल्याचा आरोप केला होता. घटनेच्या अनेक दिवसांनंतर तरुणीने सुरुवातीला मडीवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली, परंतु घटनास्थळाच्या हद्दीनुसार हे प्रकरण बाणसवाडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. तक्रार दाखल होताच बाणसवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी कॅब ड्रायव्हरला अटक करून त्याची चौकशी सुरू केली आहे.
तपासादरम्यान प्रकरणात मोठा ट्विस्ट
मात्र, पोलिसांचा तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे प्रकरणाचे स्वरूप बदलले आहे. तरुणीचा सुरुवातीचा 'गँगरेप'चा जबाब तपासात गोंधळात टाकणारा असल्याचे समोर आले आहे. वास्तविक कोणताही गँगरेप झाला नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. म्हणजेच तरुणीने चुकीचे आरोप केले होते. इतकेच नाही, तर पोलिसांना तरुणी आणि आरोपीमधील व्हॉट्सॲप चॅटही सापडले असून, दोघांची आधीपासून ओळख असल्याचे सिद्ध झाले आहे. दोघांमधील शारीरिक संबंध संमतीने झाल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. पण जर सहमतीने दोघांनी संबंध ठेवले तर आरोप का केला, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. सध्या तरुणी या प्रकरणाबद्दल गोंधळात टाकणारे जबाब देत असून, ती आणि आरोपी दोघेही केरळचे रहिवासी असल्याचे समजते.
हे सर्व संमतीनेच घडले होते.!
आरोपीनेही पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात सांगितले की, लैंगिक संबंध दोघांच्या संमतीनेच ठेवले होते. कोणताही गँगरेप झाला नसल्याचे तपासात स्पष्ट झाले असले तरी, तरुणीने इतका गंभीर गुन्हा का दाखल केला, याबाबत बाणसवाडी पोलीस सखोल तपास करत आहेत. सध्या प्रकरणात अधिक स्पष्टता आणण्यासाठी पोलीस न्यायालयासमोर तरुणीचा १६४ जबाब नोंदवण्याची तयारी करत आहेत.


