Belagavi Hotels Beat LPG Shortage : मध्य-पूर्वेतील युद्धामुळे बेळगावात कमर्शियल LPG सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या संकटामुळे अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यावर उपाय म्हणून हॉटेल मालकांनी आता कमी खर्चाच्या आणि पर्यावरणपूरक बायोमास चुलींचा वापर सुरू केला आहे.
Belagavi Hotels Beat LPG Shortage : मध्य-पूर्वेतील युद्धाचे परिणाम आता थेट बेळगाव शहरातील हॉटेल मालकांना जाणवू लागले आहेत. गेल्या महिनाभरापासून शहरात कमर्शियल LPG सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, हॉटेल व्यवसायच धोक्यात आला आहे. सिलेंडर मिळत नसल्याने अनेक हॉटेल्स, कॅन्टीन आणि रेस्टॉरंट्ससमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. काही हॉटेल्स तर तात्पुरती बंदही झाली आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी हॉटेल व्यावसायिक आता 'बायोमास' चुलींकडे वळत आहेत.
शहरात जवळपास ३५० पेक्षा जास्त हॉटेल्स आहेत. त्यांना दररोज सुमारे १६०० कमर्शियल सिलेंडरची गरज असते. मात्र, सध्या फक्त ६०० सिलेंडरचा पुरवठा होत आहे. या मोठ्या तुटवड्यामुळे हॉटेलमधील स्वयंपाक करणं एक आव्हान बनलं आहे. याचा थेट परिणाम हॉटेल मालकांच्या उत्पन्नावर होत आहे. इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळीत अडथळे आले आहेत आणि त्याचे परिणाम भारताच्या LPG पुरवठ्यावरही झाले आहेत. आयातीवर अवलंबून असल्यामुळे बेळगावसारख्या शहरांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे. काही हॉटेल्सनी तर आता पुन्हा लाकडी चुली वापरायला सुरुवात केली आहे.
बायोमास चुलींना वाढती मागणी
या कठीण परिस्थितीत हॉटेल मालक पर्याय म्हणून बायोमास चुलींचा वापर करत आहेत. पूर्वी शहरात फक्त ३० हॉटेल्समध्ये या चुली वापरल्या जात होत्या, पण आता १८० पेक्षा जास्त हॉटेल्सनी या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. कमी खर्च आणि स्थानिक पातळीवर इंधनाची उपलब्धता ही यामागची मुख्य कारणं आहेत.
या बायोमास चुली TERI (The Energy and Resources Institute) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांनी मिळून विकसित केल्या आहेत. बेळगावचे उद्योजक समीर सुरेंद्र कणबरगी हे गेल्या २५ वर्षांपासून त्यांच्या 'फिनिक्स प्रॉडक्ट्स' या कंपनीमार्फत या चुली तयार करून पुरवत आहेत.
काय आहे बायोमास चुलींचं वैशिष्ट्य?
शेतीमधील कचरा, नारळाच्या करवंट्या, लाकूड अशा जैविक इंधनावर या चुली चालतात. सामान्य लाकडी चुलीपेक्षा या जवळपास ७५% जास्त कार्यक्षम आहेत. गॅसच्या तुलनेत या चुलींवरचा खर्च ७० ते ८० टक्क्यांनी कमी होतो. यातून निर्माण होणाऱ्या वाफेचा (स्टीम) उपयोग इडली बनवण्यासाठी, दूध आणि पाणी गरम करण्यासाठीही होतो. त्यामुळे हा एक पर्यावरणपूरक पर्याय ठरत आहे.
गेल्या दशकभरात जेवढी मागणी आली नव्हती, तेवढी मागणी आता काही दिवसांतच वाढली आहे. हॉटेल्ससोबतच छोटे आणि मध्यम उद्योगही आता बायोमास गॅसिफायर वापरण्याकडे वळत आहेत. देशभरात जवळपास २०० उद्योगांमध्ये हे तंत्रज्ञान आधीपासूनच वापरात आहे आणि अनेक जण आता ते बसवण्यासाठी उत्सुक आहेत.
बायोमास चुली केवळ एक पर्याय नसून बहुपयोगी आहेत. एकाच वेळी स्वयंपाक, वाफेची निर्मिती आणि पाणी गरम करण्याची सोय असल्यामुळे इंधनाचा प्रभावीपणे वापर होतो. "सिलेंडरच्या तुटवड्यामुळे आम्ही आमच्या हॉटेलमध्ये बायोगॅस चूल वापरायला सुरुवात केली आहे," असं बेळगाव हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष अजय पै सांगतात.


