अर्जुनची गोलंदाजीची जादू, ५ विकेट्सची कमाई
- FB
- TW
- Linkdin
सचिन तेंडुलकर हे भारतीयच नव्हे तर जागतिक क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू आहेत. त्यांनी अनेक विक्रम मोडीत काढले आणि नवे विक्रम प्रस्थापित केले. त्यांना क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाते.
क्रिकेट चाहत्यांना त्यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर त्यांच्यासारखाच यशस्वी व्हावा अशी अपेक्षा होती. अर्जुन आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तो फलंदाजीपेक्षा गोलंदाजीवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. तो एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पुढे येत आहे. पण, त्याच्याकडून अद्याप कोणतीही उल्लेखनीय खेळी झालेली नाही.
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. मात्र, येणाऱ्या आयपीएल २०२५ हंगामापूर्वी मुंबई फ्रँचायझीने त्याला सोडले आहे. अर्जुनने आयपीएल लिलावापूर्वी एक उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
रणजी करंडक प्लेट गट सामन्यात गोव्याकडून खेळताना त्याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध ५ बळी घेतले. त्याच्या या कामगिरीमुळे अरुणाचल संघाला धक्का बसला. पोरवोरिम येथील गोवा क्रिकेट असोसिएशन अकादमी मैदानावर अर्जुनने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत प्रथमच ५ बळी घेतले.
१७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ही पहिलीच वेळ..
गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये अर्जुन मुंबई इंडियन्सचा सदस्य होता. आतापर्यंत आयपीएलमध्ये दोनदा मुंबईने त्याला विकत घेतले आहे. आता तो कोणत्या संघात जाईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. अरुणाचल प्रदेशविरुद्ध २५ वर्षीय अर्जुनने ९ षटकांत २५ धावा देत ५ बळी घेतले. यावेळी त्याने ३ मेडन षटके टाकली.
अर्जुनने आपल्या १७ व्या प्रथम श्रेणी सामन्यात पहिल्यांदाच एका डावात ५ किंवा त्याहून अधिक बळी घेतले. त्याने अरुणाचलच्या पहिल्या ५ फलंदाजांना बाद केले. यातील दोन फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. ५ फलंदाजांपैकी फक्त एकच फलंदाज दोन अंकी धावसंख्या गाठू शकला.
नाणेफेक जिंकून अरुणाचल प्रदेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच षटकात अर्जुनने सलामीवीर नबाम हचांगला अडचणीत आणले. नीलम ओबी (२२) आणि चिन्मय पाटील (३) यांनी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, १२ व्या षटकात अर्जुनने लागोपाठ दोन बळी घेतले.
अरुणाचलचा कर्णधार नबाम अबोने २५ चेंडूत २५ धावा केल्या. तो संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याचा संघ ३१ व्या षटकात अवघ्या ८४ धावांवर सर्वबाद झाला. गोव्याकडून अर्जुनसोबत मोहित रेडकर (३/१५) आणि कीथ मार्क पिंटो (२/३१) यांनीही धारदार गोलंदाजी केली. या सामन्यापूर्वी अर्जुनने १६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३२ बळी घेतले होते. त्यातील त्याची सर्वोत्तम कामगिरी ४/४९ होती.
अर्जुन तेंडुलकरला अजूनही सचिनचा मुलगा म्हणूनच ओळखले जाते. त्याने अद्याप कोणतीही मोठी कामगिरी केलेली नाही. मात्र, आगामी आयपीएलपूर्वी केवळ ३ षटकांत ५ बळी घेतल्याने लिलावात त्याला चांगली बोली लागू शकते.
आतापर्यंत दोनदा मुंबई संघाने अर्जुनला विकत घेतले आहे. मात्र, त्याला जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. अंतिम संघात संधी मिळाल्यावरही तो प्रभाव पाडू शकला नाही. आयपीएलमध्ये ५ सामने खेळलेल्या अर्जुनने ३ बळी घेतले आहेत. गेल्या हंगामात त्याला फक्त एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.