तृणमूल काँग्रेसमधून दररोज नवीन नवीन घडामोडी समोर येत आहेत. बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांना दररोज मोठे मोठे धक्के बसत आहेत. आमदार आणि खासदार यांच्यात फूट पडली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी (Mamta Benerjee) यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाचे आमदार फुटल्यानंतर आता ममता यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांचा पक्ष आता दोन भागात वाटला गेला आहे. दुसरीकडे संसदेतील 20 खासदारांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून त्यांना वेगळी आसन व्यवस्था देण्याची मागणी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या खासदारांमध्ये सायोनी घोष यांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

कोण आहेत सायोनी घोष?

सायोनी घोष (Saayoni Ghosh) या बंगालमधील एक प्रसिद्ध बंगाली गायिका आहेत. याशिवाय त्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार देखील आहेत. जादवपूर मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी गायलेलं गाणं वादाचं कारण बनलं होतं. ज्यामुळे त्या खूप चर्चेत आल्या होत्या. भाजप नेत्यांनी त्यावेळी त्यांच्यावर मुस्लीम तुष्टीकरणाचा आरोप केला होता. ममता बॅनर्जी यांना यामुळे देखील टीका सहन करावी लागली होती.

आम आदमी पक्षात असताना राघव चड्डा यांच्यावर देखील त्यावेळी सायोनी घोष यांनी एका गाण्याच्या माध्यमातून टीका केली होती. भाजपने देखील त्यावेळी नाराजी व्यक्त केली होती.

सायोनी घोष यांनी 2021 मध्ये टीएमसीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना आसनसोलमधून उमेदवारी मिळाली होती. पण भाजपच्या उमेदवाराकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर 2021 मध्येच त्यांना अटक देखील झाली होती. त्रिपुरामध्ये स्थानिक निवडणुकीत त्यांनी भाजपच्या एका सभेत खेला होबे असा नारा दिला होता. ज्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली होती.

ममता बॅनर्जी यांच्या आणखी एक जवळच्या व्यक्ती म्हणजे सुष्मिता देव यांनी देखील राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. पश्चिम बंगालमधील राजकारण सध्या चर्चेत आहे. कारण विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे टीएमसीला एका मागे एक धक्के लागत आहेत.

ममता बॅनर्जी यांच्यासाठी सध्याची वेळ कठीण झाली आहे. कारण दररोज त्यांच्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. पक्षात पडलेली उभी फूट यामुळे ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली आहे.