Ajit Pawar Plane Crash : अजित पवार विमान अपघाताची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हायला हवी. कारण या देशात कोणीही सुरक्षित नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
Ajit Pawar Plane Crash : 'महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हायला हवी. कारण या देशात कोणीही सुरक्षित नाही, विशेषतः राजकारणी,' असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी म्हटले आहे. याला कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सहमती दर्शवली आहे.
पत्रकारांशी बोलताना ममता म्हणाल्या, 'आम्ही फक्त सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवतो. इतर सर्व संस्थांनी पूर्णपणे तडजोड केली आहे. अजित पवार विमान अपघाताची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली झाली पाहिजे,' अशी मागणी त्यांनी केली आहे.
'सर्व नेते तातडीच्या कामांसाठी प्रवास करत असतात. अहमदाबादमध्ये कोसळलेले विमान मोठे होते. पण हे लहान होते. हे का घडले? याची चौकशी झाली पाहिजे,' अशी मागणी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.

दीदींना शरद पवार, फडणवीसांचे प्रत्युत्तर
'ममता बॅनर्जी खूप खालच्या पातळीवर जाऊन आरोप करत आहेत. त्या विनाकारण राजकारण करत आहेत,' अशा शब्दांत अजित पवारांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करणाऱ्या टीएमसी नेत्या ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्याचवेळी, 'ही पूर्णपणे एक दुर्घटना आहे. यात कोणतेही राजकारण नाही. राज्याचे मोठे नुकसान झाले आहे आणि ते कधीही भरून न येणारे आहे,' असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शरद पवार म्हणाले आहेत.
दीदींचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी
फडणवीस म्हणाले, 'दीदींचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वतः स्पष्ट केले आहे की यावर राजकारण करू नये. मला खूप दुःख होत आहे की आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे मृत्यूवरही असे घाणेरडे आणि घृणास्पद राजकारण केले जात आहे. ममता दीदी राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर गेल्या आहेत याचे मला खूप दुःख आहे; हे अत्यंत दुर्दैवी आणि पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी असे वक्तव्य करायला नको होते. महाराष्ट्राच्या अत्यंत जवळच्या आणि लाडक्या नेत्याच्या मृत्यूचे अशा प्रकारे राजकारण करून अपमान करणे पूर्णपणे चुकीचे आहे,' असे ते म्हणाले.


