दरम्यान, काल शुक्रवारी पुणे विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला पक्षी धडकला होता. त्यानंतर दिल्लीहून पुण्याला आलेल्या विमानाचा परतीचा प्रवास रद्द करण्यात आला.
हैदराबाद - अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघातात नुकताच २७१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याने देशभरात खळबळ माजली असतानाच, हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी संध्याकाळी आणखी एक दुर्घटना थोडक्यात टळली. दरम्यान, काल शुक्रवारी पुणे विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला पक्षी धडकला होता. त्यानंतर दिल्लीहून पुण्याला आलेल्या विमानाचा परतीचा प्रवास रद्द करण्यात आला.
एअर इंडियाचं हैदराबादहून मुंबईला जाणारं विमान टेकऑफसाठी सज्ज असतानाच त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं पायलटच्या लक्षात आलं. प्रसंगावधान राखत पायलटने धावपट्टीवरून विमान तत्काळ थांबवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
पायलटचं प्रसंगावधान; मोठा अपघात टळला
संपूर्ण प्रकारात पायलटने दाखवलेले धैर्य आणि वेळीच घेतलेला निर्णय महत्त्वाचा ठरला. टेकऑफपूर्वीच बिघाडाची सूचना मिळाल्याने, विमानतळावरील नियंत्रण कक्षाला (ATC) तातडीने माहिती देण्यात आली. अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांनी तातडीने धाव घेतली.
प्रवाशांची सुरक्षित रवानगी
सदर विमानात असलेल्या सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले असून, त्यांना दुसऱ्या विमानाद्वारे मुंबईला रवाना करण्यात आले. यामध्ये कोणालाही इजा झाली नसल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
विमानतळ प्रशासनाकडून तपास सुरू
ही घटना शमशाबाद येथील राजीव गांधी विमानतळावर सायंकाळच्या सुमारास घडली. विमानात नक्की कोणता तांत्रिक बिघाड झाला याचा तपास विमानतळ प्रशासन आणि एअर इंडियाच्या तांत्रिक विभागाने सुरू केला आहे.
देशभरात चिंता वाढली
अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या विमान सेवेवर आधीच प्रश्न उपस्थित होत असताना, हैदराबादमधील ही घटना हवाई प्रवासातील सुरक्षिततेच्या बाबतीत गंभीर इशारा मानली जात आहे. एका आठवड्यात दोन घटना घडल्यामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) यंत्रणाही आता सतर्क झाली आहे.

पुणे विमानतळावर एअर इंडियाचे १०० प्रवासी थोडक्यात बचावले
पुणे विमानतळावर शुक्रवारी सकाळी उतरण्याच्या वेळी एअर इंडियाच्या एका विमानाला पक्ष्याची धडक बसल्याने ते विमान तातडीने तपासणीसाठी थांबवण्यात आले. परिणामी त्याचे दिल्लीला परतीचे उड्डाण रद्द करण्यात आले. यावेळी या विमानात १०० प्रवासी होते. अहमदाबाद विमानतळावर कोसळलेल्या विमानाला पक्ष्यांचा थवा धडकला असल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर १०० प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचल्याचे दिसून येत आहे.
दिल्लीहून पुण्याकडे येणारे AI-2469 हे फ्लाइट दिल्लीहून पहाटे ५:३१ वाजता निघाले होते. हे फ्लाईट ७:१४ वाजता पुण्यात सुरक्षितपणे उतरण्यात आले. मात्र, उतरल्यानंतर तांत्रिक तपासणीदरम्यान विमानाच्या एअरबस A320 मॉडेलला पक्षी धडक झाल्याचे स्पष्ट झाले.
सुरक्षेच्या दृष्टीने, हेच विमान पुणे ते दिल्ली या मार्गावर AI-2470 म्हणून परतीचे उड्डाण करणार होते. मात्र, पक्षी धडकल्यामुळे त्याला तातडीने ग्राउंड करण्यात आले आणि परतीचे उड्डाण रद्द करण्यात आले.
एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी याबाबत अधिकृत माहिती देताना सांगितले, “AI-2470 हे पुणे ते दिल्ली जाणारे फ्लाइट, पक्ष्याची धडक झाल्यामुळे २० जून रोजी रद्द करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमानाची सखोल तपासणी आवश्यक आहे. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. या त्रासाचा परिणाम कमी करण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.”
एअर इंडियाने प्रवाशांना पुढील सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत:
- पूर्ण परतावा
- मोफत पुर्ननियोजन
- तात्पुरते निवास आणि जेवण (गरजूंना)
- पर्यायी प्रवास व्यवस्था
एअर इंडियाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, “प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आमच्या ग्राहकांनी दाखवलेली संयम आणि सहकार्याबद्दल आम्ही आभार मानतो.”
ही घटना लक्षात घेता, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात पक्ष्यांच्या संख्येतील वाढ हे हवामानाशी निगडीत एक गंभीर आव्हान बनत चालले आहे. अशा घटनांपासून विमानसेवा सुरक्षीत ठेवण्यासाठी आणखी उपाययोजनांची गरज अधोरेखित होत आहे.


