लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात मध्येच पाच प्रवासी आणि सहा कर्मचारी अचानक आजारी पडले. विमान मुंबई विमानतळावर सुखरूप उतरले आणि आजारी लोकांना रुग्णालयात नेण्यात आले. घटनेचे कारण अद्याप स्पष्ट नाही.

मुंबई - एअर इंडिया पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. यावेळी विमानात प्रवास करत असताना प्रवासी आणि कर्मचारी अचानक आजारी पडले. मात्र, ही घटना नेमकी कशामुळे घडली हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, याच्या उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

सोमवारी लंडनच्या हिथ्रो विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी विमान निघाले होते. मात्र, प्रवास सुरू झाल्यानंतर काही वेळातच विमानातील पाच प्रवासी आणि सहा कर्मचारी आजारी पडले. यामुळे विमानात खळबळ उडाली. मात्र, विमानाला आपत्कालीन लँडिंग करावे लागले नाही. विमान सुखरूपपणे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. ही बातमी मिळताच विमान कंपनीची वैद्यकीय टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली. तात्काळ उपचार दिल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर त्यांना काही काळ निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याचे समजले आहे. त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. मात्र, ही घटना नेमकी कशामुळे घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या प्रकरणी एअर इंडियानेही एक विशेष निवेदन जारी केले आहे. लंडनहून मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या विमानात अचानक पाच प्रवासी आणि सहा कर्मचारी आजारी पडले. असे का झाले याची आम्ही चौकशी करत आहोत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती नागरी विमान वाहतूक नियंत्रण संस्थेला (DGCA) देण्यात आली आहे.

अहमदाबाद दुर्घटनेपासून एअर इंडिया सतत चर्चेत आहे. लंडनला जाणारे विमान अहमदाबाद विमानतळावरून टेकऑफ झाल्यानंतर कोसळले. २४२ प्रवाशांसह एअर इंडियाचे विमान टेकऑफ झाल्यानंतर लगेचच कोसळले. त्यातील केवळ एक जण वाचला. बाकी सर्वजण मृत्युमुखी पडले. या विमानात प्रवासी आणि कर्मचारी मिळून १६९ भारतीय नागरिक होते. याशिवाय ५३ ब्रिटिश, एक कॅनेडियन, सात पोर्तुगीज नागरिक होते. १० कर्मचारी होते. या दुर्घटनेत सुमारे ३०० लोकांचा मृत्यू झाला. 

त्यानंतर एकापाठोपाठ एक एअर इंडियाच्या विमानात बिघाड झाल्याच्या किंवा विमान वेळेवर रद्द करण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे एअर इंडिया समोरची संकटे काही कमी होताना दिसून येत नाहीये.