८ व्या वेतन आयोगाची केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक आतुरतेने वाट पाहत आहेत. नवा वेतन आयोग लागू झाल्यावर पेन्शनमध्ये किती वाढ होईल, याचं गणित आपण इथे समजून घेऊया.

८ व्या वेतन आयोगाबाबत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. नवा वेतन आयोग लागू झाला, तर पेन्शन किती वाढेल? सध्या २५ हजार ते ७५ हजार रुपये बेसिक पेन्शन घेणाऱ्यांना किती फायदा होईल? याचं एक अंदाजित गणित आता समोर आलं आहे.

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, २.०, २.२५ आणि २.५७ या फिटमेंट फॅक्टरच्या (Fitment Factor) आधारे पेन्शनचं कॅल्क्युलेशन करण्यात आलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, केंद्र सरकारने किंवा ८ व्या वेतन आयोगाने अद्याप या फिटमेंट फॅक्टरची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. हा फक्त एक अंदाज आहे.

८ व्या वेतन आयोगात पेन्शन कशी वाढेल?

जुन्या बेसिक पेन्शनला नव्या बेसिक पेन्शनमध्ये बदलण्यासाठी फिटमेंट फॅक्टर वापरला जातो. जर हा फॅक्टर २.० ठरला, तर तुमची सध्याची बेसिक पेन्शन थेट दुप्पट होईल. जर तो २.२५ असेल तर २.२५ पट आणि २.५७ असेल तर २.५७ पट पेन्शन वाढेल.

२५ हजार रुपये पेन्शन असेल तर किती मिळणार?

सध्या एखादा निवृत्त केंद्रीय कर्मचारी २५,००० रुपये बेसिक पेन्शन घेत असेल, तर अंदाजित गणितानुसार:

२.० फिटमेंट फॅक्टर: ५०,००० रुपये

२.२५ फिटमेंट फॅक्टर: ५६,२५० रुपये

२.५७ फिटमेंट फॅक्टर: ६४,२५० रुपये

म्हणजेच, जो फिटमेंट फॅक्टर फायनल होईल, त्यानुसार पेन्शनच्या रकमेत मोठा बदल दिसेल.

५० हजार रुपये पेन्शन असेल तर किती मिळणार?

सध्या ५०,००० रुपये बेसिक पेन्शन घेणाऱ्यांसाठी अंदाजित गणित:

२.० फिटमेंट फॅक्टर: १,००,००० रुपये

२.२५ फिटमेंट फॅक्टर: १,१२,५०० रुपये

२.५७ फिटमेंट फॅक्टर: १,२८,५०० रुपये

७५ हजार रुपये पेन्शन असेल तर किती मिळणार?

सध्या ७५,००० रुपये बेसिक पेन्शन घेणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही रक्कम आणखी मोठी असेल.

२.० फिटमेंट फॅक्टर: १,५०,००० रुपये

२.२५ फिटमेंट फॅक्टर: १,६८,७५० रुपये

२.५७ फिटमेंट फॅक्टर: १,९२,७५० रुपये

कर्मचारी संघटनांची मागणी काय आहे?

विविध कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटनांनी ८ व्या वेतन आयोगासमोर आपल्या मागण्या ठेवल्या आहेत. NC-JCM सह इतर संघटनांची मागणी आहे की, शेवटच्या बेसिक पगारामधून ६७ टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळावी. तसेच फॅमिली पेन्शन ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणीही जोर धरत आहे. सध्याच्या जुन्या पेन्शन योजनेनुसार (OPS), शेवटचा बेसिक पगार किंवा निवृत्तीपूर्वीच्या १० महिन्यांचा सरासरी पगार, यापैकी जे जास्त असेल त्याच्या ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते. तर फॅमिली पेन्शन ३० टक्के आहे. आता सरकार या मागण्या मान्य करतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

पेन्शन वाढ कधी फायनल होणार?

८ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी आल्यावर आणि केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिल्यावरच खरी पेन्शन किती असेल, हे स्पष्ट होईल. त्यामुळे आत्ताच २.० किंवा २.५७ फिटमेंट फॅक्टर नक्की झालाय, असं समजू नका. अंतिम निर्णय येईपर्यंत वाट पाहावी लागेल.