मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांनी घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला आहे. याबद्दलची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांनी अखेर आपल्या वैवाहिक नात्याबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर आदिनाथ कोठारेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोट घेत असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे.

आदिनाथ कोठारेंची भावनिक पोस्ट

फेसबुक पोस्टद्वारे आदिनाथ कोठारे यांनी आपल्या नात्याबाबत खुलासा केला. त्यांनी म्हटले की, “जोडीदार म्हणून आमचा प्रवास संपत आहे. पण तरी आमची मुलगी जिजासाठी आम्ही कायम एकत्र राहू. तिच्या आयुष्यात प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा कायम राहावा यासाठी आम्ही दोघेही जबाबदारीने तिचे संगोपन करू.” तसेच, एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल आणि एकमेकांबद्दल कायम आदर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच माध्यमे आणि जनतेने त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करावा, अशी विनंतीही केली आहे.

View post on Instagram

घटस्फोटाच्या चर्चांवर उर्मिलाने काय म्हटलं होतं?

काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत उर्मिला कानेटकरने सोशल मीडियावर सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. "सोशल मीडियावर काय बोललं जातं याचा मी फार विचार करत नाही. अनेक चर्चा खऱ्या असतात, तर अनेक पूर्णपणे खोट्या असतात," असे तिने म्हटले होते. तसेच "प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारी प्रत्येक गोष्ट सत्य असतेच असे नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणे योग्य नाही," असेही उर्मिलाने म्हटले.

 मैत्रीतून फुललेलं प्रेम

उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांची ओळख एकत्र काम करताना झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. मराठी मनोरंजन विश्वातील ही जोडी चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय होती.

चाहत्यांना बसला धक्का

घटस्फोटाच्या चर्चांना अखेर अधिकृत दुजोरा मिळाल्याने चाहत्यांमध्ये नाराजी आहे. मात्र दोघांनीही परस्पर आदर आणि मुलीच्या भविष्यासाठी एकत्र काम करण्याची भूमिका घेतल्याने त्यांच्या निर्णयाचे स्वागतही होत आहे.