श्रद्धा कपूरच्या आगामी ‘ईठा’ चित्रपटाच्या शीर्षकावरून सुरू झालेला वाद अखेर मिटला आहे. यामुळे सिनेमाचा प्रीमियर त्यांच्या गावी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या बहुचर्चित ‘ईठा’ या चित्रपटाच्या रिलीजचा मार्ग आता मोकळा झाला आहे. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र सिनेमाच्या नावावरुन वाद निर्माण झाला होता. पण आता हा वाद मिटला आहे. विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी चित्रपटाच्या नावाला कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय रिलीजपूर्वी श्रद्धा कपूरसह संपूर्ण टीम नारायणगावाला भेट देण्याची शक्यता आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

‘ईठा’च्या शीर्षकावरील वाद अखेर मिटला

चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी ‘ईठा’ या नावावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. या शीर्षकामागील संकल्पना आणि उद्देश स्पष्ट केला. या चर्चेनंतर नारायणगावकर कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले. यामुळे विठाबाईंच्या चित्रपटाच्या शीर्षकाला आता कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

रिलीजपूर्वी नारायणगावाला भेट

वाद मिटताच चित्रपटाच्या टीमने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याआधी श्रद्धा कपूर आणि चित्रपटाची संपूर्ण टीम नारायणगावाला भेट देणार आहे. या भेटीमुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. निर्माते काही विशेष घोषणा करू शकतात, अशी चर्चा रंगली आहे.

श्रद्धा कपूरही असणार उपस्थितीत

विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित नारायणगावकर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच श्रद्धा कपूर आणि टीम नारायणगावात येणार आहे. निर्मात्यांना मोहित नारायणगावकर यांनी चित्रपटाचा पहिला प्रीमियर नारायणगावात आयोजित करण्याची विनंती केली आहे. याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. या दौऱ्यावेळी श्रद्धा कपूर स्वतः उपस्थित राहणार आहे.

नारायणगावातच होणार पहिला प्रीमियर?

टीमच्या नारायणगाव भेटीमुळे आता पहिला प्रीमियर याच ठिकाणी होणार का, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तमाशा आणि लावणी परंपरेचे महत्त्वाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या नारायणगावात चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

विठाबाईंच्या जीवनावर आधारित चित्रपट

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली ‘ईठा’ सिनेमा तयार झाला आहे. या सिनेमात प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत झळकणार असून, रणदीप हुड्डा आणि मोहम्मद झीशान अय्यूब यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमा येत्या २८ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे.