वादग्रस्त 'इंडियाज गॉट लॅटेंट' शोच्या वादानंतर जवळपास एका वर्षाने कॉमेडियन समय रैना आणि यूट्यूबर रणवीर अलाहबादिया 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये एकत्र दिसले. कपिल शर्माने आपल्या नेहमीच्या शैलीत या वादावर कोटी केली, तर दुसरीकडे समयने शो बंद होण्यापूर्वी कपिलने आपल्याला धोक्याची सूचना दिली होती, असा मोठा खुलासा केला.
जवळपास एक वर्षापूर्वी 'इंडियाज गॉट लॅटेंट' या शोमुळे झालेल्या वादानंतर कॉमेडियन समय रैना आणि यूट्यूबर रणवीर अलाहबादिया पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. दोघांनी 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये एन्ट्री घेऊन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी कपिल शर्माने आपल्या खास अंदाजात विनोद करत वातावरण हलकंफुलकं ठेवलं, तर समय आणि रणवीरनेही त्या वादावर मोकळेपणाने गप्पा मारल्या. या एपिसोडमुळे केवळ त्यांच्या पुनरागमनाचीच चर्चा झाली नाही, तर प्रेक्षकांना त्यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा अनुभवता आली.
वादानंतर पहिल्यांदाच समय-रणवीर एकत्र
'इंडियाज गॉट लॅटेंट'च्या वादानंतर समय रैना आणि रणवीर अलाहबादिया पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवर दिसले. त्यांच्या येण्याने शोमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झाला. चाहते बऱ्याच काळापासून या रियुनियनची वाट पाहत होते आणि हा एपिसोड येताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. यावेळी दोघांनीही जुना वाद लपवण्याऐवजी त्यावर मनमोकळी चर्चा केली, ज्यामुळे प्रेक्षकांना त्यांचा प्रामाणिकपणा आणि सहजपणा भावला.
कपिल शर्माच्या विनोदात मोठा टोमणा
शो दरम्यान कपिल शर्माने आपल्या शैलीत दोघांवरही हलकेफुलके टोमणे मारले. त्याने गंमतीत म्हटलं की, 2025 मध्ये हे दोघे सर्वाधिक सर्च केले जाणारे लोक होते. इतकंच नाही, तर फक्त इंटरनेटवरच नाही, तर वेगवेगळ्या राज्यांची पोलीसही त्यांना 'सर्च' करत होती. कपिलचा हा अंदाज प्रेक्षकांना खूप आवडला आणि संपूर्ण सेगमेंटमध्ये हास्याचे फवारे उडाले.
समय रैनाचा मोठा खुलासा—आधीच मिळाली होती धोक्याची सूचना
बोलता-बोलता समय रैनाने एक धक्कादायक खुलासा केला. तो म्हणाला, “शप्पथ सांगतो, माझा शो बंद होण्याच्या आदल्या दिवशी मला सर (कपिल शर्मा) यांचा फोन आला होता की, तुझ्यासोबत काहीतरी वाईट होणार आहे.” यावर कपिल शर्मानेही होकार दिला आणि सांगितलं की, त्याने आपल्या अनुभवावरून समयला सावध राहायला सांगितलं होतं. तो म्हणाला, “बघ, तू आता नजरेत आला आहेस, जरा सांभाळून राहा... मी काही भविष्य वगैरे सांगत नाहीये, फक्त अनुभवावरून बोलतोय.”
हलक्याफुलक्या अंदाजात एपिसोडचा शेवट
एपिसोडच्या शेवटी वातावरण पूर्णपणे हलकंफुलकं झालं. कपिलने गंमतीत म्हटलं की, आता शोमधील सर्वजण विवाहित आहेत आणि त्यांना मुलंबाळं आहेत, त्यामुळे बोलताना काळजी घ्यायला हवी. यावर समय रैनाने हसून आणि रणवीर अलाहबादियाकडे बघत म्हटलं, “मी तर सांभाळूनच केलं होतं सर,” ज्यामुळे वातावरण आणखी मजेशीर झालं. रणवीरनेही हसून उत्तर दिलं, “नाही-नाही, आज आपण फॅमिली-फ्रेंडलीच राहूया.” यावर सेटवर उपस्थित असलेले सर्वजण हसून लोटपोट झाले.


