Ramayana Box Office Prediction : रणबीर कपूरचा 'रामायण' ३००० कोटी कमवणार?
रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाकडून पहिल्याच दिवशी ७५-१०० कोटींच्या कमाईची अपेक्षा आहे. प्रेक्षकांना चित्रपट भावल्यास तो ३,००० कोटींचा टप्पा गाठू शकतो, असा अंदाज ट्रेड तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

रामायण सिनेमाची चर्चा
नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. रणबीर कपूर प्रभू राम, सई पल्लवी सीता माता आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा चित्रपट मानला जातोय.
पहिल्याच दिवशी हा चित्रपट ७५ ते १०० कोटींची कमाई करू शकतो. तर एकूण कमाई १००० ते ३००० कोटींच्या घरात जाऊ शकते, असा अंदाज ट्रेड तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
बिहारमधील पूर्णिया येथील रूपबानी सिनेमाचे मालक विशेक चौहान यांच्या मते, प्रेक्षक या चित्रपटाला केवळ मनोरंजन म्हणून नाही, तर श्रद्धेच्या दृष्टिकोनातून पाहतील. त्यामुळे हिंदू प्रेक्षकांनी चित्रपटाला डोक्यावर घेतल्यास तो २५००-३००० कोटी सहज कमवू शकतो.
वितरक राज बन्सल आणि अक्षय राठी यांनीही या चित्रपटाला ऐतिहासिक यश मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

सिनेमासाठी बुकिंग
सिनेपोलिस इंडियाचे आशिष मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आधीच एक लाखांहून अधिक तिकीटं विकली आहेत. पहिल्या दिवशी १६०० हून अधिक शोचे नियोजन आहे.
मिराज सिनेमाही २२५ स्क्रीन्सवर दररोज ९६० शो दाखवणार आहे. हिंदी, कन्नड, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. दिल्ली-एनसीआर, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये तिकिटांची मोठी मागणी आहे.
आयमॅक्स (IMAX) आणि थ्रीडी (3D) फॉरमॅटला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. काही आयमॅक्स तिकिटांचे दर ३००० रुपयांपर्यंत आहेत, तर साधी तिकीटं २०० रुपयांपासून सुरू होत आहेत.
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सुट्ट्यांचा चित्रपटाला फायदा होऊ शकतो. मात्र, सणांच्या गडबडीमुळे संध्याकाळच्या शोवर थोडा परिणाम होऊ शकतो, असेही मिश्रा यांनी सांगितले.
किती कमाई करू शकतो?
दक्षिण भारतात या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. सूर्याचा 'सीन' (Scene) आणि नयनताराचा 'मुकुथी अम्मन २' या प्रादेशिक चित्रपटांचे आव्हान 'रामायण'समोर असेल.
ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते, 'केजीएफ' फेम यशमुळे कर्नाटकमध्ये चित्रपट चांगली कमाई करू शकतो. सई पल्लवीमुळे इतर दाक्षिणात्य राज्यांतही प्रेक्षक आकर्षित होतील. दक्षिण भारतातून चित्रपट ३०-४० कोटी कमवू शकतो.
'पुष्पा २' किंवा 'आरआरआर'सारख्या मास चित्रपटांपेक्षा हा पौराणिक चित्रपट वेगळा आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद महत्त्वाचा ठरेल, असे बाला म्हणाले.
एआर रहमान आणि हान्स झिमर यांनी चित्रपटाला संगीत दिले असून, ऑस्कर विजेत्या 'डीएनईजी' (DNEG) कंपनीने व्हीएफएक्स (VFX) केले आहे. नमित मल्होत्रा आणि यश यांनी या भव्य चित्रपटाची निर्मिती केली आहे.

