आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी मायकल जॅक्सनसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. २००९ मध्ये मायकलच्या मृत्यूची बातमी कळल्यावर काय वाटलं होतं, हे त्यांनी सांगितलं आहे.
Ram Gopal Varma on Michel Jackson : आपल्या बेधडक मतांसाठी आणि वादग्रस्त ट्विट्ससाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (RGV) सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांनी 'किंग ऑफ पॉप' मायकल जॅक्सनसाठी (Michael Jackson) एक लांबलचक आणि भावनिक पोस्ट लिहिली आहे. नुकताच 'मायकल' हा सिनेमा पाहिल्यानंतर RGV यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. २००९ मध्ये मायकल जॅक्सनच्या मृत्यूची बातमी कळली, तो क्षण किती धक्कादायक होता, हे त्यांनी या पोस्टमध्ये सांगितलं आहे. आपल्या इंजिनिअरिंगच्या दिवसात विजयवाडाच्या एका छोट्या व्हिडिओ पार्लरमध्ये पहिल्यांदा 'थ्रिलर' पाहिल्याचा अनुभवही त्यांनी शेअर केला. मायकलचं गाणं, त्याचा डान्स आणि त्याची जादू आपल्यावर कशी झाली, हे सांगताना वर्मा यांनी त्याला 'देवाची खास निर्मिती' म्हटलं आहे.

राम गोपाल वर्मा यांनी आपल्या एक्स (पूर्वीचं ट्विटर) हँडलवर एक भावनिक नोट शेअर केली. त्यांनी लिहिलं की ते मायकल जॅक्सनचा 'तिरस्कार' करतात, कारण त्याच्या मृत्यूने एक भ्रम तोडला. मायकलसारखी व्यक्ती सामान्य माणसाच्या पलीकडची असू शकते, हा विश्वास त्याच्या मृत्यूने नाहीसा केला.
आपल्या पोस्टमध्ये वर्मा पुढे लिहितात, "माझ्या इंजिनिअरिंगच्या दिवसांत, २ जानेवारी १९८४ रोजी विजयवाडामध्ये एका मित्राने मला एका व्हिडिओ पार्लरमध्ये खेचून नेलं. त्याने आग्रह केला की मला काहीतरी बघायलाच हवं. लाईट बंद झाली आणि 'थ्रिलर' सुरू झालं. तो माझ्यासाठी पोटात बसलेल्या गुद्द्यासारखा होता. ते फक्त गाणं किंवा डान्स नव्हता, ते एक आक्रमण होतं. सामान्य गोष्टी बघण्याची सवय झालेल्या माझ्या डोळ्यांना हिंसकपणे उघडायला भाग पाडलं गेलं. त्याचं प्रोडक्शन, कोरिओग्राफी, आणि तो स्वर्गीय आनंद... सगळं एकाच दैवी रूपात मिसळलं होतं. मी कधी कल्पनाही केली नव्हती, अशा पातळीवरचा तो एक सोहळा होता आणि त्या वादळाच्या केंद्रस्थानी होता तो... मायकल जॅक्सन. तो माणसासारखा मुव्ह करत नव्हता. तो सहजतेने सरकत होता, तो एखाद्या स्फोटासारखा होता, तो तरंगत होता. त्याने पडद्यावर अशा अलौकिक शक्तीसारखं राज्य केलं, जणू काही क्षणांसाठी त्याने मानवी शरीर धारण केलं होतं. मी त्या पार्लरमधून पूर्णपणे सुन्न होऊन बाहेर पडलो. माझं हृदय धडधडत होतं, मन गोंधळात पडलं होतं. हा माणूस खरा असूच शकत नाही. तो देव आहे किंवा देवांनी आपल्याला पृथ्वीवर आशीर्वाद देण्यासाठी घडवलेली एक कल्पना आहे, असं मला वाटलं. त्याच्या प्रत्येक म्युझिक व्हिडिओने तो स्तर आणखी उंचावला. 'बीट इट', 'बिली जीन', 'स्मूथ क्रिमिनल', 'ब्लॅक ऑर व्हाईट', 'रिमेंबर द टाइम', 'बॅड' ही त्यापैकी काही नावं."
"माझ्या करिअरमध्ये प्रत्येक गाण्याच्या चर्चेत, मग ती माझ्या टीमसोबत असो किंवा इतर दिग्दर्शकांसोबत, आम्ही नेहमी त्याच्या व्हिडिओकडेच परत यायचो. त्याचं काम एक असा मापदंड बनलं होतं, जिथपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. ते प्रेरणा आणि नम्रता या दोन्हींचा स्रोत होतं. आणि हो, जसं मी म्हणालो, तो फक्त डान्स नव्हता, फक्त आवाज नव्हता. ती त्याची जादू होती. तो माणूस गुरुत्वाकर्षणासारखा होता, ज्यावर कोणाचं नियंत्रण नव्हतं. त्याच्यावरचे आरोप किंवा वाद-विवाद? त्यांनी मला कधीच फरक पडला नाही. तो फक्त पार्श्वसंगीताचा गोंधळ होता. त्याने माझ्या संवेदनांना आणि आत्म्याला जे दिलं, ते कोणत्याही मानवी न्यायालयाच्या किंवा मासिकाच्या आरोपांपेक्षा खूप मोठं होतं. माझ्यासाठी तो देव होता किंवा देवाची खास निर्मिती होता आणि म्हणूनच मी त्याचा तिरस्कार करतो. मी मायकल जॅक्सनचा तिरस्कार करतो कारण तो मेला. त्याने तो माणूस होता हे सिद्ध केलं, याचा मला राग आहे. त्यालाही आपल्यासारखंच ऑक्सिजन आणि रक्ताची गरज होती, हे त्याने दाखवून दिलं. त्याचंही हृदय थांबू शकतं, याचा मला राग आहे. CNN वर 'मायकल जॅक्सनचा मृतदेह शवगृहात पाठवला' ही बातमी पाहण्याइतका मी जगलो, याचा मला तिरस्कार आहे."
"त्याने माझ्या पाठीत खंजीर खुपसला. माझ्या कल्पनेशी त्याने विश्वासघात केला. तो स्वर्ग सोडून मर्त्य झाला. मायकल, मी तुझा तिरस्कार करतो, कारण तू माझं स्वप्न एका दुःस्वप्नात बदललंस. आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. शब्दांत व्यक्त करू शकेन, त्यापेक्षा जास्त प्रेम करतो. तू आता कुठेही असशील, कोणत्याही जगात असशील, मला खात्री आहे की तू आकाशगंगेत मूनवॉक करत असशील, आणि अशी अवकाश वादळं निर्माण करत असशील, ज्यांची चमक तारेही सामावून घेऊ शकणार नाहीत. आणि विजयवाडाच्या त्या व्हिडिओ पार्लरमध्ये तू मला जो अनुभव दिलास, तो मी मरेपर्यंत सोबत ठेवेन," असं म्हणत त्यांनी आपली पोस्ट संपवली.


