लोकप्रिय अभिनेता धनुषने 'रांझना' चित्रपटाच्या AI द्वारे बदललेल्या क्लायमॅक्सवर नाराजी व्यक्त केली आहे. त्याने म्हटले आहे की या बदलांमुळे चित्रपटाचा आत्माच हिरावून घेण्यात आला असून, अशा प्रकारच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी कठोर नियम बनवले जावेत.
मुंबई : लोकप्रिय अभिनेता धनुषने १२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या त्याच्या गाजलेल्या हिंदी चित्रपट 'रांझना'च्या एका नव्या बदलावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटाच्या मूळ कथेला आणि आत्म्याला धक्का पोहोचवणारे बदल कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून करण्यात आल्यामुळे तो चांगलाच व्यथित झाला आहे.
'रांझना' पुन्हा प्रदर्शित करताना त्याचा क्लायमॅक्स AI च्या मदतीने बदलण्यात आला आहे. याबाबत धनुषने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, त्याने या प्रकाराबद्दल आपला संताप व्यक्त केला आहे. त्याने लिहिले आहे की, “रांझना'चा AI च्या मदतीने बदललेला शेवट पाहून मला खूप दुःख झाले आहे. या बदलामुळे चित्रपटाचा आत्माच हिरावून घेण्यात आला आहे. माझ्या स्पष्ट विरोध असूनही संबंधित पक्षांनी हे बदल केले.”
धनुषने पुढे म्हटले, "बारा वर्षांपूर्वी ज्या चित्रपटासाठी मी काम केले होते, तो हा चित्रपट नाही. सिनेमा किंवा इतर कलाकृतींमध्ये AI चा वापर करून बदल करणे हे कला आणि कलाकारांसाठी एक गंभीर आव्हान आहे. हे कथेची प्रामाणिकता आणि सिनेमाचा वारसा धोक्यात आणत आहे. अशा प्रकारच्या कृत्यांना भविष्यात आळा घालण्यासाठी कठोर नियम बनवले जातील अशी आशा आहे."
धनुषच्या या भूमिकेमुळे 'AI' च्या मदतीने कलाकृतींमध्ये बदल करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मूळ कलाकृतीसोबत छेडछाड करणे योग्य आहे का, हा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.

