अभिनेते प्रदीप रावत यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं. सलमान खानने त्यांच्या 'बागी' सिनेमातील सहकलाकाराची आठवण काढली, तर आमिर खानसह 'लगान'च्या टीमने त्यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली. रावत 'सरफरोश', 'गजनी' आणि 'लगान'मधील भूमिकांसाठी ओळखले जायचे.
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने अभिनेते प्रदीप रावत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्याने १९९० साली आलेल्या 'बागी: अ रिबेल फॉर लव्ह' या सिनेमातील एक फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. 'भावा, तुझ्यासोबत खूप चांगले क्षण घालवले,' असं भावनिक कॅप्शन सलमानने लिहिलं आहे. प्रदीप यांनी सलमानसोबत 'पत्थर के फूल' आणि 'टायगर जिंदा है' या सिनेमांमध्येही काम केलं होतं.
आमिर खान आणि 'लगान' टीमकडून अखेरचा निरोप
याआधी बुधवारी संध्याकाळी, 'लगान' सिनेमाच्या टीमने प्रदीप रावत यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली. यामध्ये आमिर खान, यशपाल शर्मा, दयाशंकर पांडे, राजेंद्र गुप्ता आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा समावेश होता. प्रदीप यांनी 'लगान'मध्ये 'देवा' ही भूमिका साकारली होती. अंत्यसंस्कारानंतर अनेक कलाकारांनी एएनआयशी बोलताना प्रदीप यांच्या आठवणी शेअर केल्या आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.
यशपाल शर्मा म्हणाले, "माझ्याकडे शब्दच नाहीत. भगवान उनकी आत्मा को शांती दे. वो हमेशा हमारी यादों में जिंदा रहेंगे."
'आपल्या इंडस्ट्रीचं मोठं नुकसान'
प्रदीप रावत यांचं मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये कॅन्सरशी झुंज देताना निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले, "प्रदीप रावत एक उत्तम व्यक्ती आणि एक अप्रतिम अभिनेते होते. त्यांचं जाणं हे आपल्या इंडस्ट्रीसाठी खूप मोठं नुकसान आहे. त्यांचा आत्मविश्वास, सकारात्मकता आणि प्रचंड ऊर्जा त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवायची. त्यांना कॅन्सर आहे, हे त्यांनी कधीच सांगितलं नाही. खरं तर, आमचं तीन-चार महिन्यांपूर्वीच बोलणं झालं होतं, त्यामुळे ते या आजाराशी लढत होते हे ऐकून मला मोठा धक्का बसला."
प्रदीप यांच्या पश्चात त्यांची पत्नी कल्याणी रावत आणि मुलगा विक्रमादित्य रावत असा परिवार आहे.
प्रदीप रावत यांची कारकीर्द
भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा असलेले अभिनेते प्रदीप रावत हे हिंदी, तेलुगू आणि तमिळ सिनेमातील त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जायचे. 'सरफरोश', 'लगान', 'सई' (तेलुगू), 'नायक' (तेलुगू) आणि 'गजनी' यांसारख्या सिनेमांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत.
विकी कौशलच्या 'छावा' या सिनेमात त्यांनी नुकतंच काम केलं होतं. यात त्यांनी येसाजी कंक यांची भूमिका साकारली होती. (एएनआय)
