फक्त २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या आणि ४५२ कोटींची कमाई करणाऱ्या 'हनुमान अंश' सिनेमाच्या निर्मात्यांमध्ये आता हक्कांवरून मोठा वाद सुरू झालाय. कोणताही एक व्यक्ती परस्पर निर्णय घेऊ शकत नाही, अशी जाहीर नोटीस निर्मात्यांनी काढली आहे.

मुंबई : चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वात कमी बजेटमध्ये बनून बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या 'हनुमान अंश' (Hanuman Ansh) सिनेमाच्या यशानंतर आता एक मोठा वाद चव्हाट्यावर आलाय. तब्बल ४५२.८६ कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या सिनेमाचे हक्क, प्रमोशन आणि डिस्ट्रिब्युशनवरून निर्मात्यांमध्ये जुंपली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर दोन प्रमुख निर्मात्यांनी आता अधिकृत पब्लिक नोटीस (Public Notice) जारी केली आहे.

प्रसिद्ध संत नीम करोली बाबा (Neem Karoli Baba) यांच्या जीवनावर आधारित 'हनुमान अंश' हा बायोपिक फक्त २ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला होता. या सिनेमाने जगभरात धुमाकूळ घातला. पण आता सिनेमाचा बिझनेस आणि अधिकारांवरून टीममध्येच खडाजंगी सुरू झालीय. 'स्वयंभू मीडिया नेटवर्क'च्या (Swambhu Media Network) माध्यमातून निर्मात्या नम्रता जी सिंग (Namrata G Singh) आणि दिग्दर्शक डॉ. विशाल चतुर्वेदी (Dr Vishal Chaturvedi) यांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलंय.

स्वतःला कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणवणाऱ्या नम्रता आणि विशाल यांनी सोमवारी (२ नोव्हेंबर) त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सविस्तर नोटीस शेअर केली आहे.

'हनुमान अंश' सिनेमासाठी एकच अधिकृत चॅनेल: काय आहे नोटीसमध्ये?

'हनुमान अंश' सिनेमासाठी फक्त एकच अधिकृत कम्युनिकेशन चॅनेल आहे, असं या नोटीसच्या सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आलंय. जे लोक सिनेमाच्या हक्कांवर दावा करत आहेत, त्यांना थेट इशारा देण्यात आलाय. काही लोक स्वतःला सिनेमाचा बिझनेस आणि हक्क सांभाळण्याचे अधिकारी समजत आहेत, ही बाब कंपनीच्या निदर्शनास आलीय. पण कोणत्याही एका व्यक्तीला असे अधिकार नाहीत, हे यात स्पष्ट करण्यात आलंय.

भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिनेमाचे थिएट्रीकल, ओटीटी स्ट्रीमिंग, सॅटेलाईट ब्रॉडकास्ट, म्युझिक, गेमिंग आणि लायसन्सिंगचे हक्क निर्मात्यांमधील करारानुसारच हाताळले जातील. कंपनीच्या वतीने पीआर (PR), मार्केटिंग, पुरस्कार आणि बिझनेस पार्टनरशिपची जबाबदारी फक्त नम्रता आणि विशाल हेच सांभाळतील. परस्पर किंवा एकट्याने केलेले कोणतेही व्यवहार बेकायदेशीर मानले जातील आणि ते कंपनीला मान्य नसतील. या ठरलेल्या प्रक्रियेबाहेर केलेले कोणतेही दावे, पुरस्कार किंवा बिझनेस डील्स कंपनी स्वीकारणार नाही, असा सज्जड दम देण्यात आलाय.

याशिवाय, सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञांना (Cast and Crew) पॉडकास्ट, मुलाखती, सार्वजनिक कार्यक्रम किंवा प्रमोशनमध्ये सिनेमाबद्दल बोलण्यापूर्वी कंपनीच्या अधिकृत कम्युनिकेशन टीमची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलंय.

चौघांची संमती अनिवार्य – वादाचं मूळ काय?

रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाचे नम्रता जी सिंग, डॉ. विशाल चतुर्वेदी, रागिणी सोना आणि अनुप्रिया नगर असे चार सह-निर्माते आहेत. नोटीसमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे, "प्रॉडक्शन करारानुसार (Production Agreement) प्रमोशन, पुरस्कार, पार्टनरशिप आणि देश-विदेशातील हक्कांबाबत कोणताही निर्णय घेण्यासाठी चारही निर्मात्यांची संमती (Approval) अनिवार्य आहे."

गेल्या काही आठवड्यांपासून सिनेमाच्या प्रमोशनवरून निर्मात्यांमध्ये धुसफूस सुरू होती. मीडियामध्ये फक्त एकाच निर्मातीला जास्त प्रसिद्धी आणि हायलाईट मिळत असल्यामुळे इतरांमध्ये नाराजी होती, असं म्हटलं जातंय.

विशेषतः, सिनेमाची २१ वर्षीय तरुण निर्माती अनुप्रिया नगर (Anupriya Nagar) प्रमोशनमध्ये सर्वात पुढे होती. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, ती पोस्ट-प्रॉडक्शनच्या टप्प्यात या टीममध्ये सामील झाली होती. एवढंच नाही तर, 'हनुमान अंश' सिनेमाची ३ भागांची 'ट्रायलॉजी' (Trilogy) सिरीज बनवणार असल्याचं आणि दुसऱ्या भागासाठी संपूर्ण टीम पुन्हा एकत्र येणार असल्याचंही तिने जाहीर केलं होतं.

पण, आता या ताज्या वादामुळे आणि पब्लिक नोटीसमुळे नियोजित ट्रायलॉजी सिरीजचं भविष्य अंधारात गेलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही निर्माते आता नीम करोली बाबा यांची कथा आपापल्या पद्धतीने स्वतंत्रपणे पडद्यावर आणण्याचा विचार करत आहेत. दुसरीकडे, अनुप्रिया नगर सिनेमा निर्मितीच्या तिच्या अनुभवावर एक पुस्तक लिहिण्याच्या आणि स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस सुरू करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, 'हनुमान अंश' सिनेमा ७ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि २०२६ मधील सर्वात मोठा बॉक्स ऑफिस हिट ठरला. सिनेमाच्या ओटीटी/डिजिटल रिलीजची अधिकृत तारीख टीमने अद्याप जाहीर केलेली नाही.