सार

2024 हे वर्ष शर्वरी वाघसाठी यशस्वी ठरले आहे. 'मुंज्या', 'महाराज' आणि 'वेदा' या चित्रपटांतील तिच्या कामाचे कौतुक झाले आहे. ती दिवाळी कुटुंबासोबत साजरी करत असून, यश आणि प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे.

2024 हे वर्ष शर्वरीसाठी अतिशय खास ठरलं आहे. तिने 'मुंज्या' या पहिल्या 100 कोटींच्या ब्लॉकबस्टरमध्ये चमक दाखवली, नंतर 'महाराज' या ग्लोबल स्ट्रीमिंग हिटमध्ये झळकली आणि तिच्या तिसऱ्या 'वेदा' चित्रपटासाठीही अभिनय कौशल्यासाठी तिला एकमुखाने दाद मिळाली. शर्वरीला आता बॉलिवूडची नवी उगवती तारा म्हणून ओळखले जात आहे आणि या दिवाळीला ती व तिचे कुटुंब प्रेक्षकांच्या प्रेमासाठी मनःपूर्वक कृतज्ञ आहेत.

शर्वरी म्हणते, “गेल्या 3 वर्षांतील माझ्यासाठी ही सर्वोत्तम दिवाळी आहे. मला फक्त कृतज्ञता व नशीबाची जाणीव होत आहे की 2024 मध्ये मला हे अनुभवता येत आहे. मागील तीन वर्षे माझ्यासाठी एक अभिनेत्री म्हणून खरोखर कसोटीची वेळ होती. हा अस्तित्वाचा लढा होता. रोज संघर्ष, चित्रपट शोधणे आणि सतत ऑडिशन देणे. म्हणून मला माझ्या मनापासून उत्सव साजरा करता आला नाही. मला वाटते, प्रत्येकाच्या बाबतीत असेच होते जेव्हा गोष्टी अपेक्षेप्रमाणे जात नाहीत. मी खूप आनंदी आहे की, शेवटी कष्ट फळाला आले आहेत.”

शर्वरी पुढे सांगते, “मी या दिवाळीला आणखी यश, अधिक मान्यता आणि सर्वांच्या कडून अधिक प्रेमासाठी प्रार्थना करते आहे. मला माहीत आहे की, माझे कुटुंबही यावर्षी खूप आनंदी आहे. आम्ही एक कुटुंब म्हणून आता अधिक हसत आहोत. ज्या वेळी माझ्यासाठी कठीण काळ होता, त्या वेळी त्यांनी माझा आधारस्तंभ म्हणून माझी साथ दिली याबद्दल मी त्यांचे आभार मानते.”

दिवाळीतल्या लहानपणीच्या आवडत्या आठवणींविषयी सांगताना शर्वरी म्हणाली, “दरवर्षी नरक चतुर्दशीला आम्ही सूर्योदयापूर्वी उठतो. मोठी चटई टाकतो, दिवे लावतो, जुनी मराठी गाणी लावतो आणि गरम तेल, उटणे आणि केशर एकमेकांच्या हातांवर आणि चेहऱ्यावर लावतो. याला 'पहिली पहाट' म्हणतात. हिवाळ्याची सुरुवात दर्शवणारा हा सोहळा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे.”

ती पुढे म्हणाली, “त्यानंतर केशर आणि उटनाने आंघोळ करतो - हे सर्व सूर्योदयाच्या आधी केले जाते. नंतर सगळे मिळून फराळाच्या नाश्त्याचा आनंद घेतो. फराळामध्ये गोड आणि चटकदार पदार्थ असतात, जे दिवाळीपूर्वी 3-4 दिवसांपासून केले जातात - त्यात चकली, चिवडा, शेव, करंजी, शंकरपाळे, बेसन लाडू असे अनेक पदार्थ असतात. आम्ही हे टेबलवर वाढतो, आणि नाश्त्याच्या वेळी एकत्र बसून मनसोक्त गप्पा मारतो.”

दिवाळी आपल्या कुटुंबासोबत कशी साजरी करते, यावर बोलताना शर्वरी म्हणते, “माझ्यासाठी दिवाळी कुटुंबासोबत साजरी करणे खूप महत्त्वाचे आहे. माझा भाऊ शाळेत आहे, त्यामुळे त्याला दिवाळीच्या सुट्ट्या असतात. माझी बहिणही ऑफिसमधून सुट्टी घेते. आपल्या परिवारासोबत राहणं, जेवणानंतर मिठाईवर चर्चा करणं, यापेक्षा सण साजरा करण्याचा कोणता आनंद असू शकतो? हा एक असा भाग आहे जो मला खूप आवडतो आणि आनंद देतो.”

शर्वरी लवकरच वायआरएफ स्पाय युनिव्हर्सच्या मोठ्या ॲक्शन एंटरटेनर ‘अल्फा’ मध्ये बॉलिवूड सुपरस्टार आलिया भट्टसोबत झळकणार आहे.