Mouni Roy Divorce : टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा बिझनेसमन पती सूरज नांबियार यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी सध्या जोर धरला आहे. या दोघांनी अजून यावर अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही.
Mouni Roy Divorce : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मौनी आणि तिचा पती सूरज नांबियार यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सतत येत आहेत. ताज्या रिपोर्ट्सनुसार, त्यांचं लग्न जवळपास ६ महिन्यांपूर्वीच मोडलं आहे, पण अजून कायदेशीर घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. अशातच, त्यांच्या नात्यात पुन्हा काही सुधारणा होण्याची शक्यता आहे का? असा प्रश्नही उपस्थित होत होता. पण सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेल्या नव्या माहितीने या शक्यतेवरही जवळपास पूर्णविराम लावला आहे.

६ महिन्यांपासून वेगळे राहत आहेत मौनी-सूरज
पत्रकार विक्की लालवानी यांच्या रिपोर्टनुसार, मौनी रॉय आणि सूरज नांबियार गेल्या ६ महिन्यांपासून एकत्र राहत नाहीत. त्यांच्या पोस्टमध्ये दावा केला आहे की, "नात्यातला रस संपलाय, प्रेम फिकं पडलंय आणि भांडणं वाढली आहेत. एखादा चमत्कार झाला तरच ठीक, नाहीतर दोघांनी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाही." रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय की, मौनी ऑक्टोबर २०२५ पासून बहुतेक सोशल कार्यक्रमांमध्ये एकटीच दिसत आहे. इतकंच नाही, तर तिने वकिलांशी चर्चाही सुरू केल्याचं म्हटलं जात आहे.
घटस्फोटाचा अर्ज नाही, पण समुपदेशनाची चर्चा
रिपोर्टमध्ये हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, दोघांनी अजून अधिकृतपणे घटस्फोटासाठी अर्ज केलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, जर हे प्रकरण पुढे गेलं, तर दोघांना समुपदेशन सत्रांमध्ये (counselling sessions) सहभागी व्हावं लागू शकतं. जवळच्या सूत्रांचा दावा आहे की, सूरज नांबियारला मुंबईच्या ग्लॅमरस आयुष्यात नेहमीच अवघडल्यासारखं वाटत होतं. रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की, सार्वजनिक जीवनात मौनीच्या लोकप्रियतेसमोर आपली ओळख कुठेतरी दबली जात आहे, असं त्याला अनेकदा वाटायचं.
'अभिमान' सिनेमासारखं झालंय मौनी-सूरजचं नातं
रिपोर्ट्समध्ये दोघांच्या नात्याची तुलना १९७३ सालच्या 'अभिमान' या क्लासिक सिनेमाशी केली जात आहे. सिनेमात जसं अमिताभ बच्चन यांनी साकारलेलं पात्र जया भादुरी यांच्या यशाने अस्वस्थ होतं, तशीच काहीशी परिस्थिती इथेही पाहायला मिळत असल्याचा दावा केला जात आहे. मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी अनेक वर्षं डेटिंग केल्यानंतर २७ जानेवारी २०२२ रोजी गोव्यात लग्न केलं होतं. बंगाली आणि मल्याळी अशा दोन्ही पद्धतींनी झालेल्या या लग्नाचे फोटो त्यावेळी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.


