दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांच्या 'दशावतार' या मराठी चित्रपटाने ऑस्कर २०२६ च्या अधिकृत कंटेंशन लिस्टमध्ये स्थान मिळवून इतिहास रचला आहे. कोकणातील लोककलाकार बाबुली मेस्त्री यांच्या जीवनातील संघर्ष आणि कौटुंबिक नात्यांवर आधारित हा चित्रपट आहे. 

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा आहे. दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांच्या 'दशावतार' या चित्रपटाने जागतिक चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या 'ऑस्कर २०२६' (९८ वे ॲकॅडमी अवॉर्ड्स) च्या अधिकृत शर्यतीत (Contention List) स्थान मिळवले आहे. प्रादेशिक सिनेमासाठी हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

काय आहे ही 'कंटेंशन लिस्ट'?

जगभरातून आलेल्या सुमारे २,००० हून अधिक चित्रपटांमधून केवळ १५० ते २५० उत्कृष्ट चित्रपटांची निवड या यादीत केली जाते. 'दशावतार'ने या यादीत स्थान मिळवून ऑस्करच्या मुख्य स्पर्धेच्या दिशेने पहिले आणि महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

'लाल मातीतील कथा' आता जागतिक व्यासपीठावर!

दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी स्वतः सोशल मीडियावर या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी 'ॲकॅडमी'कडून आलेला ईमेल शेअर करत लिहिले की, "दशावतारची मुख्य स्पर्धेच्या 'ओपन फिल्म कॅटेगरी'मध्ये निवड झाली आहे. हा टप्पा गाठणारा बहुधा हा पहिलाच मराठी चित्रपट असावा." झी स्टुडिओजने देखील या यशाचे कौतुक करताना म्हटले आहे की, "लाल मातीत जन्मलेली ही कथा आता जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवत आहे."

काय आहे 'दशावतार'ची कथा?

हा चित्रपट कोकणातील लोककला आणि कौटुंबिक संघर्षाची एक हळवी गोष्ट सांगतो. कोकणातील प्रसिद्ध लोककलाकार 'बाबुली मेस्त्री' यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. भगवान विष्णूंचे १० अवतार साकारणाऱ्या बाबुली यांची दृष्टी जशी कमी होत जाते, तसा त्यांचा संघर्ष वाढत जातो. दुसरीकडे, त्यांचा मुलगा 'माधव' याला शहरात आधुनिक जीवन जगायचे आहे. जुनी परंपरा आणि नवीन स्वप्ने यांच्यातील हा भावनिक प्रवास प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

तगडी स्टारकास्ट: या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, रवी काळे आणि अभिनय बेर्डे यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.

ऑस्कर २०२६ चे महत्त्वाचे टप्पे

१२ ते १६ जानेवारी २०२६: अंतिम नामांकनांसाठी (Final Nominations) मतदान होईल.

२२ जानेवारी २०२६: ऑस्करची अधिकृत नामांकने जाहीर होतील.

१५ मार्च २०२६: हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये मुख्य सोहळा पार पडेल.

'दशावतार' सोबतच नीरज घेवान यांचा 'होमबाउंड' हा भारतीय चित्रपटही 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट' श्रेणीत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.