महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय 'लाडकी बहीण' योजनेवर आधारित मराठी सिनेमा लवकरच येणार आहे. या सिनेमात गौतमी पाटील आणि अण्णा नाईक महत्वाच्या भूमिकेत असणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय 'लाडकी बहीण' योजनेवर आधारित एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'लाडकी बहीण' या शीर्षकाने तयार होणाऱ्या या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच सातारा येथे पार पडला. ही योजना केवळ सरकारी मदतीपुरती मर्यादित न राहता, महाराष्ट्रातील असंख्य महिलांच्या आयुष्याचा भाग बनली असून, त्यावर आधारीत चित्रपट प्रेक्षकांना भावनिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून सशक्त अनुभव देणार आहे.

ओम साई सिने फिल्म आणि शुभम फिल्म प्रोडक्शनची निर्मिती

हा चित्रपट ओम साई सिने फिल्म आणि शुभम फिल्म प्रोडक्शन यांच्या बॅनरखाली निर्मित केला जात आहे. शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील आणि अनिल वणवे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर दिग्दर्शनाची जबाबदारी गणेश शिंदे सांभाळत आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद लेखन शितल शिंदे यांनी केले असून, ‘लाडकी बहीण’ या योजनेवर आधारित कथानक अत्यंत खेळकर आणि कौटुंबिक शैलीत सादर केले जाणार आहे.

साताऱ्यात पार पडला मुहूर्त, मान्यवरांची उपस्थिती

साताऱ्यात झालेल्या मुहूर्त सोहळ्याला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी क्लॅप दिला. या वेळी कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधिक्षक तुषार दोशी, सांस्कृतिक विभाग उपाध्यक्ष पंकज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या चित्रपटाद्वारे महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या योजनेला चित्रपटाच्या माध्यमातून वेगळ्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

प्रमुख भूमिका आणि संगीत संयोजन

चित्रपटात मोहन जोशी, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, विजय पाटकर, अनिल नगरकर, सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, गौतमी पाटील, प्रिया बेर्डे, रुक्मिणी सुतार, भारत गणेशपुरे, जयवंत वाडकर, सारिका जाधव आणि जयश्री सोनवले यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका असणार आहेत. छायालेखन गजानन शिंदे यांनी केले आहे, तर संगीत संयोजन विनीत देशपांडे यांचे आहे. या चित्रपटातील गाणी प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि आनंद शिंदे यांच्या आवाजात सादर होणार आहेत. नृत्यदिग्दर्शन पंकज चव्हाण यांचे असून, प्रशांत कबाडे व शिवाजी सावंत कार्यकारी निर्माते आहेत.

समाजोपयोगी विषय मनोरंजनाच्या माध्यमातून

'लाडकी बहीण' चित्रपट एक सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण विषय अत्यंत मनोरंजनात्मक व कौटुंबिक स्वरूपात प्रेक्षकांपुढे मांडणार आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या वास्तव जीवनाशी जोडलेली ही कथा त्यांच्या संघर्षाला, आशा-आकांक्षांना आणि परिवर्तनाला सन्मान देणारी ठरणार आहे.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.