KRK Arrested : मुंबईतील ओशिवरा परिसरात झालेल्या दोन राउंड गोळीबार प्रकरणात अभिनेता व स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल रशीद खान उर्फ केआरके याला अटक करण्यात आली आहे.
KRK Arrested : मुंबईतील ओशिवरा परिसरात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली असून, या प्रकरणातील मुख्य संशयित अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल रशीद खान उर्फ केआरके याला पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ओशिवरा पोलिसांनी केआरकेला ताब्यात घेतले होते, त्यानंतर शनिवारी सकाळी त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली.
केआरकेची कबुली: पोलिस काय म्हणाले?
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान केआरकेने गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. त्याने परवानाधारक बंदूक वापरल्याचे मान्य केले असले, तरी कोणालाही इजा करण्याचा आपला हेतू नव्हता, असा दावा त्याने केला आहे.
बंदूक जप्त; कागदपत्रांची तपासणी सुरू
ओशिवरा पोलिसांनी केआरकेची बंदूक जप्त केली असून, ती परवानाधारक असल्याची कागदपत्रे तपासली जात आहेत. पुढील कायदेशीर कारवाईसाठी सर्व कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटना नेमकी काय होती?
ही घटना 18 जानेवारी रोजी अंधेरीतील ओशिवरा परिसरातील नालंदा सोसायटीत घडली. एका निवासी इमारतीवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. घटनास्थळी दोन रिकाम्या काडतुसे सापडली असून, दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील फ्लॅटवर गोळ्यांचे निशाण आढळून आले आहे.
लेखक-दिग्दर्शक व मॉडेलच्या घरावर गोळीबार
एबीपीच्या वृत्तानुसार, नालंदा सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर लेखक-दिग्दर्शक नीरज कुमार मिश्रा (45) राहतात, तर चौथ्या मजल्यावर मॉडेल प्रतिक बैद (29) यांचा फ्लॅट आहे. या दोन्ही फ्लॅटवर गोळीबार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
फॉरेन्सिक तपासातून धागा मिळाला
घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ओशिवरा पोलिस ठाण्याच्या 18 अधिकाऱ्यांच्या पथकाने तपास सुरू केला. सुरुवातीला सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने तपासात अडचणी आल्या. मात्र, फॉरेन्सिक टीमच्या मदतीने गोळ्या केआरकेच्या बंगल्यातून झाडल्या गेल्याची शक्यता पुढे आली.
वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत
कमाल रशीद खान हा अभिनेता, निर्माता आणि लेखक असून, तो ‘बिग बॉस’ सीझन 3 (2009) मध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर त्याने ‘एक व्हिलन’ (2014) चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारली होती. केआरके हा अनेकदा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिला आहे.


