कृति सेननच्या रक्षाबंधन स्पेशल जाहिरातीवरून सोशल मीडियावर वाद निर्माण झाल्यानंतर ज्वेलरी ब्रँड GIVA ने जाहिरात मागे घेतली आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कृति सेननचा रक्षाबंधन स्पेशल जाहिरातीतला लूक आणि कुत्र्याला राखी बांधण्याच्या सीन्सवरुन सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. वाढत्या ट्रोलिंगनंतर ज्वेलरी ब्रँड गिवाने (GIVA) सदर जाहिरातीचा व्हिडीओ मागे घेतला आहे. कंपनीने याबाबत अधिकृत निवेदन जारी करत भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांचा पूर्ण आदर असल्याचे स्पष्ट केले आहे.

गिवाने काय म्हटलं?

जाहिरात मागे घेताना गिवाने म्हटले की, भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांचा कंपनीला पूर्ण आदर आहे. ब्रँड म्हणून संपूर्ण कुटुंबासोबत सण साजरे करण्याबरोबरच पाळीव प्राणीही कुटुंबाचा भाग असल्याने त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्याचा उद्देश जाहिरातीमागे होता. मात्र, या जाहिरातीमुळे समाजातील कोणत्याही घटकाच्या भावना दुखावल्या असतील तर तो कंपनीचा उद्देश नव्हता, असेही गिवाने स्पष्ट केले. लोकांच्या भावनांचा आदर करत जाहिरात सर्व माध्यमांमधून मागे घेत असल्याचे कंपनीने सांगितले.

View post on Instagram

कृति सेननच्या लूकवरूनही ट्रोलिंग

कृति सेननने गिवासाठी रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही विशेष जाहिरात शूट केली होती. जाहिरात प्रदर्शित होताच तिच्या कपड्यांवरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. कृतिने ऑफ-व्हाइट रंगाचा ब्रालेट-स्टाइल ब्लाउज, केप आणि ड्रेप्ड स्कर्ट असा लूक केला होता. रक्षाबंधनासारख्या भारतीय सणाच्या जाहिरातीसाठी हा पोशाख योग्य नसल्याचे काही सोशल मीडिया युजर्सनी म्हटले. त्यानंतर कृति सेननच्या लूकवरूनही मोठ्या प्रमाणात टीका झाली.

कंगना रणौतनेही व्यक्त केलं मत

अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतनेही या वादावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. महिलांना आपल्या आवडीचे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य असल्याचे तिने म्हटले. मात्र, कपडे परिधान करताना काही मर्यादांचा विचार केला पाहिजे, असा सूर तिच्या प्रतिक्रियेत होता.

कृति सेननने दिलं सडेतोड उत्तर

या टीकेला कृति सेनननेही उत्तर दिले. एखाद्या महिलेच्या कपड्यांवरून तिच्या संस्कृतीबद्दलच्या आदराचे मूल्यमापन करू नये, असे तिने स्पष्ट केले. रक्षाबंधनाची खरी भावना कपड्यांमध्ये नसून प्रेम, भावना आणि परंपरेत आहे, असे कृतिने म्हटले. रक्षाबंधन हा सुरक्षा आणि प्रेमाचा सण असून, भाऊ-बहिणी एकमेकांची काळजी घेण्याचे आणि संरक्षण करण्याचे वचन देतात, असेही तिने सांगितले.

कृतिच्या मते, हे प्रेम आणि काळजी केवळ माणसांपुरते मर्यादित नसून पाळीव प्राणीही कुटुंबाचा भाग असल्याने त्यांच्यापर्यंतही पोहोचते. याच भावनेतून जाहिरातीत कुत्र्याला राखी बांधण्याचे दृश्य दाखवण्यात आले होते.

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

या जाहिरातीवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काही युजर्सनी जाहिरातीच्या संकल्पनेवर आणि कृति सेननच्या लूकवर टीका केली, तर काहींनी सण साजरा करण्याची पद्धत आणि कपड्यांवरून अभिनेत्रीला लक्ष्य करण्यास विरोध केला. अखेर वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर गिवाने जाहिरात मागे घेण्याचा निर्णय घेतला.