बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' नावाच्या नवीन टॉक शोचे सूत्रसंचालन करणार आहेत. हा शो टॉक शो क्षेत्रातील "धडाडीचा, तिखट आणि स्पष्टवक्ता" म्हणून वर्णन केला जात आहे.

बॉलिवूडमधील दोन लोकप्रिय अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना लवकरच ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या नव्या टॉक शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्राइम व्हिडिओवर हा शो लवकरच प्रदर्शित होणार असून, यामध्ये बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींचा सहभाग असणार आहे.

प्राईम व्हिडीओने केली घोषणा

 या शोची घोषणा प्राइम व्हिडिओने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं – “त्यांच्याकडे चर्चेचा खजिना आहे… आणि तो खूप जास्त आहे… #TwoMuchOnPrime, लवकरच येत आहे.” या घोषणेनंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांनी आणि सेलिब्रिटींनी उत्साह व्यक्त केला. दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी शोचं नाव आणि होस्ट्सचं कौतुक करताना “हे खूप मजेदार असणार आहे,” असं म्हटलं.

खुल्या शैलीत साधणार संवाद 

या टॉक शोमध्ये काजोल आणि ट्विंकल हे दोघंही त्यांच्या खास शैलीत खुल्या, स्पष्ट आणि विनोदी पद्धतीने बॉलिवूडमधील मोठ्या नावांसोबत संवाद साधणार आहेत. शो निर्माते बनिजय आशियाने या शोला "धाडसी, तिखट आणि स्पष्टवक्ता" असं वर्णन केलं आहे. प्रेक्षकांना हास्य, मनोरंजन आणि अंतर्दृष्टी यांचा खास मिलाफ या शोमध्ये पाहायला मिळणार आहे.

काजोल ही ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता है’ यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रसिद्ध आहे. ती लवकरच विशाल फुरिया यांच्या ‘माँ’ या पौराणिक हॉरर चित्रपटात दिसणार आहे. तर ट्विंकल खन्ना एक अभिनेत्री, स्तंभलेखिका आणि लेखिका असून तिने ‘मिसेस फनीबोन्स’, ‘पायजामा आर फॉरगिविंग’ यांसारखी पुस्तके लिहिली आहेत.

प्राईम व्हिडीओने काय म्हटलं? 

प्राइम व्हिडिओचे प्रमुख निखिल मधोक यांनी सांगितले की, "हा शो एका वेगळ्या पद्धतीने टॉक शो प्रकारात नवीन आणि ताजेपणा आणणार आहे. काजोल आणि ट्विंकल त्यांच्या चटकदार शैलीत सेलिब्रिटींशी दिलखुलास संवाद साधतील." त्यांनी असेही नमूद केले की, शोमध्ये करिष्मा सेलिब्रिटी पाहुण्यांच्या यादीत असतील.

बनिजय आशियाच्या मृणालिनी जैन यांनी सांगितले की, “हा शो काजोल आणि ट्विंकलच्या निडर आणि ताज्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब आहे. त्यांच्या मैत्री, अनुभव आणि दृष्टिकोनाच्या आधारे तयार झालेला हा कार्यक्रम प्रेक्षकांना हास्य, विचार आणि मनोरंजन देणारा ठरेल.” ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ लवकरच प्राइम व्हिडिओवर पाहायला मिळणार आहे.