‘साथ निभाना साथिया’ मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
मुंबई : ‘साथ निभाना साथिया’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी सोशल मीडियावर विविध सामाजिक आणि सार्वजनिक मुद्द्यांवर आपली भूमिका मांडत असते. यावेळी देवोलीनाने महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत देवोलीनाने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज असल्याचे म्हटले आहे.
‘प्रत्येक विभागात असे अधिकारी असतील तर…’
देवोलीना भट्टाचार्जीने एक्सवरील पोस्टमध्ये तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक केले. एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या कामामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले आहे. तसेच लोक त्यांच्या कामाची प्रशंसा करत असल्याचे देवोलीनाने म्हटले आहे.प्रत्येक शासकीय विभागात अशा प्रकारे प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी असतील, तर कायद्याचे उल्लंघन करण्यापूर्वी गैरप्रकार करणारे अनेकदा विचार करतील असेही पोस्टमध्ये म्हटले आहे.
खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवरही व्यक्त केली चिंता
देवोलीनाने आपल्या पोस्टमधून खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा मुद्दाही उपस्थित केला. फूडसंदर्भात गंभीर त्रुटी आणि गैरप्रकार आढळल्यानंतरही काही परिस्थितीत परवाना रद्द करण्याबाबत मर्यादा असल्याचा दावा देवोलीनाने केला. या संदर्भात तिने न्यायव्यवस्थेतील एका निर्णयाचाही उल्लेख केला आहे.
तुकाराम मुंढेंच्या बदल्यांचा केला उल्लेख
देवोलीनाने तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीतील वारंवार झालेल्या बदल्यांचाही उल्लेख केला. तिच्या मते, प्रामाणिकपणाची किंमत अनेकदा मोठी मोजावी लागते. मुंढे यांना सध्याच्या पदावर पुरेसा वेळ मिळावा आणि त्यांना गैरप्रकार दूर करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षाही देवोलिनाने व्यक्त केली.
२१ वर्षांत २५ वेळा बदली
तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील बदल्यांचा मुद्दा यापूर्वीही चर्चेत राहिला आहे.जवळजवळ २१ वर्षांच्या सेवाकाळात तुकाराम मुंढे यांच्या २५ वेळा बदल्या झाल्याचे बोलले जाते. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे त्यांची प्रशासकीय कारकीर्दही चर्चेचा विषय ठरली आहे.आता देवोलीनाच्या या पोस्टनंतर तुकाराम मुंढे यांच्या कामाची आणि त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.


