ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक आहे. रिपोर्ट्सनुसार, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ८९ वर्षीय धर्मेंद्र यांना सुमारे आठवड्याभरापूर्वी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

आपल्या दमदार अभिनय आणि मनमोहक व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांच्या निधनाचे वृत्त पसरल्यानंतर अभिनेत्री ईशा देओल यांनी निधनाचे वृत्त फेटाळले आहे.

'बॉलिवूडचा ही-मॅन' म्हणून प्रेमाने ओळखले जाणारे धर्मेंद्र हे केवळ एक अभिनेते नाहीत, तर ते भारतीय सिनेमाच्या एका युगाचे प्रतीक आहेत. 'शोले'मधील त्यांचा 'वीरू' असो, 'फूल और पत्थर' मधील त्यांचा बंडखोर नायक असो, किंवा 'चुपके चुपके' मधील विनोदी भूमिका असो, त्यांनी साकारलेल्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली. त्यांच्या अभिनयातील सहजता, त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व आणि पडद्यावरील त्यांची जबरदस्त उपस्थिती यामुळे ते नेहमीच इतरांपेक्षा वेगळे ठरले.

View post on Instagram

कुटुंबियांचा आधार आणि कलाकारांच्या भेटी

अभिनेते रुग्णालयात असताना त्यांच्या पत्नी हेमा मालिनी, मुलगा सनी देओल आणि कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. कुटुंबाचा प्रत्येक सदस्य या कठीण काळात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी रुग्णालयात भेट दिली. यात सुपरस्टार्स सलमान खान आणि शाहरुख खान यांचाही समावेश आहे.

एका गौरवशाली कारकिर्द

धर्मेंद्र यांनी त्यांच्या ६ दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. १९६० मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटाद्वारे त्यांनी पदार्पण केले आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 'आये मिलन की बेला', 'आये दिन बहार के', 'धर्मेंद्र', 'प्रतिज्ञा', 'यादों की बारात' आणि 'शालिमार' यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमुळे त्यांना सुपरस्टार म्हणून ओळख मिळाली. त्यांच्या या योगदानाबद्दल भारत सरकारने २०१२ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.