Welcome To The Jungle सिनेमात 'फ्लॉप ॲक्टर' म्हटल्यावर अक्षय कुमारने काय प्रतिक्रिया दिली? ट्रेलर लाँचवेळी त्याने काय खुलासा केला आणि त्याच्या निवृत्तीच्या चर्चांवर तो काय म्हणाला? जाणून घ्या.
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या 'वेलकम टू द जंगल' या नव्या सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या सिनेमाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात, सिनेमात त्याला 'फ्लॉप ॲक्टर' का म्हटलं आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अक्षयने अगदी मनमोकळेपणाने उत्तर दिलं. त्याचे काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर सलग फ्लॉप ठरल्यामुळे त्याच्या या उत्तराने सोशल मीडियावर एक नवी चर्चा सुरू झाली आहे.

सिनेमात 'फ्लॉप ॲक्टर' का म्हटलं?
कार्यक्रमात अक्षय कुमारला विचारण्यात आलं की, सिनेमात तुझ्यासाठी 'फ्लॉप ॲक्टर' हा शब्द का वापरला आहे? यावर उत्तर देताना तो म्हणाला, "याकडे सिनेमाची कथा आणि पात्र म्हणून बघायला हवं, माझ्या खऱ्या आयुष्याशी त्याचा संबंध जोडू नका." अक्षय पुढे म्हणाला, "सिनेमातले असे संवाद कुणाला टोमणे मारण्यासाठी नसतात. जेव्हा तुम्ही सिनेमा बघता, तेव्हा तिथली पात्रं आणि कथेनुसार गोष्टी समजून घेता. मला खात्री आहे की आपले प्रेक्षक खूप हुशार आहेत. त्यामुळे हे इतकं गांभीर्याने घेण्याची गरज नाही."
काय आहे 'वेलकम टू द जंगल'ची कहाणी?
चार मिनिटांपेक्षा जास्त लांबीच्या या ट्रेलरमध्ये कॉमेडी, ॲक्शन आणि सिनेमाच्या आत सिनेमा अशी भन्नाट संकल्पना दिसते. यावेळी 'वेलकम' फ्रँचायझी शहरांमधून बाहेर पडून थेट जंगलाच्या रोमांचक वातावरणात पोहोचली आहे, जिथे गैरसमजांमुळे कलाकारांचा एक ग्रुप मोठ्या संकटात सापडतो.
या सिनेमात अक्षय कुमार एका अशा अभिनेत्याची भूमिका साकारत आहे, जो सलग फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर आपलं करिअर पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. एका यशस्वी अभिनेत्रीसोबत त्याला नवीन सिनेमा मिळाल्यावर त्याचं आयुष्य बदलणार असं वाटत असतानाच एक ट्विस्ट येतो. या अभिनेत्रीची भूमिका जॅकलिन फर्नांडिस साकारत आहे.
सिनेमाची शूटिंग ठरली खरं ॲडव्हेंचर
कथेत मोठा ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा सिनेमाची संपूर्ण टीम सीमेजवळच्या एका गावात पोहोचते. तिथले गावकरी या कलाकारांना खरे सैनिक समजतात आणि एका धोकादायक गँगपासून वाचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकतात. या गँगचा म्होरक्या जॅकी श्रॉफच्या पात्राने साकारला आहे. यानंतर अनेक मजेशीर प्रसंग घडतात, जिथे अक्षयचं पात्र लोकांना वारंवार समजावण्याचा प्रयत्न करतं की तो खऱ्या आयुष्यातला हिरो नाही, तर फक्त एक अभिनेता आहे.
अक्षय कुमार खरंच निवृत्त होणार?
ट्रेलर लाँचवेळी त्याला विचारलं की, काम सोडून द्यावं असं कधी मनात येतं का? यावर त्याने मजेशीर उत्तर दिलं. अक्षय कुमार म्हणाला, "सकाळी ४ वाजता उठल्यावर काही सेकंद वाटतं की आता आराम करावा, पण लगेच आठवतं की शूटवर जायचंय आणि ३०० लोक माझी वाट बघत आहेत. हा विचार फक्त ५ सेकंद टिकतो आणि नंतर निघून जातो." तो पुढे म्हणाला की, “मी कधीच निवृत्त होणार नाही. मी या विचाराच्या विरोधात आहे.”
अक्षय कुमारचे फ्लॉप सिनेमे
गेल्या काही वर्षांत अक्षय कुमारचे 'सम्राट पृथ्वीराज', 'रक्षा बंधन', 'राम सेतू', 'सेल्फी', 'मिशन राणीगंज', 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'खेल खेल में' यांसारखे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे चालले नाहीत. यापैकी काही सिनेमांना समीक्षकांनी दाद दिली, पण बॉक्स ऑफिसवर ते सरासरी किंवा फ्लॉप ठरले. 'वेलकम टू द जंगल' हा सिनेमा २६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


